- मुरलीधर भवारकल्याण : लॉकडाऊन जाहीर होताच गेस्ट हाउस, लॉजिंग-बोर्डिंग ही सेवा अत्यावश्यक सेवेत येत नसल्याने त्यांच्यावर प्रथम गदा आली. या व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही चुकीचा आहे. त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसला. आता हॉटेल, लॉज सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, याकरिता अटींचे पालन करणे बंधनकारक केले आहे.
कल्याण स्टेशन ते शीळफाट्यापर्यंत किमान २५ लॉज आहेत. कल्याण-काटई ते अंबरनाथ रोडला २० लॉज आहेत. कल्याण ते टिटवाळादरम्यान व टिटवाळा शहरात २५ पेक्षा जास्त लॉज आहेत. कल्याण स्टेशन परिसरात १० पेक्षा जास्त गेस्ट हाउस व लॉज आहेत. डोंबिवली शहर ते मानपाडा रोड आणि औद्योगिक वसाहतीतही १० पेक्षा जास्त लॉज आहेत. या ठिकाणी मोठे पर्यटनस्थळ नसताना लॉजिंग-बोर्डिंगची संख्या लक्षणीय आहे. आयुक्तांनी ४६ हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन कायम ठेवत अन्य ठिकाणची बंदी उठविली आहे.
हॉटेल, गेस्ट हाउस सुरू करण्यास परवानगी दिली असली, तरी काहींनी अजून सुरू केलेली नाही. एका गेस्ट हाउसचालकाने सांगितले की, प्रत्येक ग्राहकाचे थर्मल स्कॅनिंग केले जाते. रूममध्ये सॅनिटायझर ठेवले आहे. ग्राहकांना सोशल डिस्टन्सिंगची सक्ती केली आहे. एका खोलीत एकाच ग्राहकाला प्रवेश दिला जातो. आमच्याकडे १२ तासांचे ५०० रुपये एका रूमचे भाडे आहे. त्यामुळे अतिउच्च दर्जाच्या सुविधा पुरविल्या जात नाही. मात्र, रूम बरेच दिवस बंद होत्या. त्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. आंतरराज्य बस वाहतूकसेवा सुरू आहे. प्रवासीसंख्या जास्त असली, तरी गेस्ट हाउसमध्ये जास्त ग्राहक नाहीत.
ग्राहकांची संख्या कमी
कल्याण-मुरबाड रोडवरील एका नामांकित हॉटेलच्या मालकाने सांगितले की, त्यांच्या हॉटेलमध्ये अद्ययावत सुविधा आहेत. एका ग्राहकाला २४०० रुपये आकारले जातात. त्याला त्यात चहा, नाश्ता दिला जातो. त्याची रूम सॅनिटाइझ केली जाते. सॅनिटायझर मशीन प्रवेशद्वाराजवळ लावले आहे. शिवाय, प्रत्येक खोलीत सॅनिटायझरची बाटली ठेवली आहे. प्रवेशद्वाराजवळ ग्राहकाचे थर्मल स्कॅनिंग केले जाते. त्याच्या शरीराचे तापमान जास्त असल्यास त्याला थेट रुग्णालयात पाठविले जाते. सरकारने दिलेल्या अटींचे पालन करून व्यवसाय सुरू केला आहे. मात्र, ग्राहकसंख्या कमी आहे.