पन्नास खोके, एकदम ओके...! कितीही निधी दिला तरी जनता गद्दारी स्वीकारत नाही; जितेंद्र आव्हाड यांचा अजित पवारांवर पलटवार
By अजित मांडके | Published: June 25, 2024 07:12 PM2024-06-25T19:12:43+5:302024-06-25T19:14:16+5:30
बारामतीला 1हजार कोटीचा निधी दिला होता. मात्र, बारामतीकरांनी गुर्मी उतरवली ना? जनता गद्दारी कधीच स्वीकारत नसते; हे ध्यानात ठेवा, अशा शब्दात शरद पवार गटाचे आमदार. जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समाचार घेतला.
ठाणे : मुंब्य्रासाठी ५० कोटीचा निधी दिला; त्याबद्दल अजित पवार यांचे आभार मानतो. पण, ५० कोटी रूपये देऊन तुम्ही जनतेला विकत घ्याल; अशी अपेक्षा ठेवू नका. बारामतीला 1हजार कोटीचा निधी दिला होता. मात्र, बारामतीकरांनी गुर्मी उतरवली ना? जनता गद्दारी कधीच स्वीकारत नसते; हे ध्यानात ठेवा, अशा शब्दात शरद पवार गटाचे आमदार. जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समाचार घेतला.
अजित पवार गटाने मुंब्रा भागासाठी ५० कोटींचा निधी आणल्याची माहिती दिल्यानंतर आव्हाड यांनी पलटवार केला आहे. आमच्याशी गद्दारी करून बाहेर पडल्यानंतर मी अजित पवार यांच्यावर तोफ डागली होती. त्यामुळे ते मला निधी देताना हात आखडता घेतील, यात वादच नव्हता. या आधीही तीन वर्षे ते असेच वागत होते. आता माझ्याविरुद्ध ज्याला उभा करायचा आहे. त्याच्या नावे हा निधी दिलेला आहे. एवढंच नाही तर आमच्या नगरसेवकांना पाच कोटीची ऑफरही दिली होती; पण, एकही नगरसेवक त्यांच्याकडे गेला नाही. त्यामुळे आता पन्नास कोटी दिले आहेत. तसे पाहता ते हजार कोटीही आणतील. पण, ज्यांनी हा निधी आणलाय त्यांनी आपल्या वाॅर्डातही बघावे. आपल्या वाॅर्डातील स्लाॅटर हाऊसच्या रस्त्याची काय अवस्था आहे, हे त्यांनी पहावे. अशी टीका त्यांनी नजीब मुल्ला यांचे नाव न घेता केली. सर्वात गमतीचा भाग म्हणजे, आमदाराला निधी न देता जो माणूस आता नगरसेवकही नाही: त्याला निधी दिला गेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात हे पहिल्यांदाच घडत आहे. याची जनता नोंद घेणारच आहे. अजित पवारांसोबतच्या आमदारांना त्यांनी हजारो कोटींचा निधी दिला होता. तरीही ते लोकसभेच्या निवडणुकीत मागे पडले म्हणूनच ते आता आमचे दार ठोठावत आहेत. निधी देऊन मुंब्र्यातील जनता खुष होणार नाही. कारण, येथील जनतेला विकास काय आहे, हे चांगलेच माहित आहे असेही ते म्हणाले.