ठाणे : तुम्ही कोण आहेत हे महत्वाचे नाही तर तुम्ही काय करता हे अतिशय महत्वाचे आहे. पुस्तक वाचनाला कुठलाही शॉर्टकट नाही. ते अपरिहार्य आहे. मी पेशाने चार्टर्ड अकाउंटंट असलो तरी माझे पहिले प्रेम हे क्लिष्ट आकडेमोडीवर न बसता अभिजात अक्षरांवर बसले. पुस्तकांची गोडी, प्रेम हे माझ्या मोठ्या भावामुळे लागले ते कायमचे. जीवनात प्रचंड नैराश्य आले होते , काय करावे समजत नव्हते मात्र उत्तम ग्रंथांच्या सहवासात आलो, त्यातुन जगण्याचा मंत्र मिळाला, वाचनामुळे प्रगल्भ झालो आणि आयुष्य सत्कारणी लागले. पुढे ही वाचनाची गोडी फक्त माझ्याच पुरतीच सीमित न ठेवता माझ्या लाखो मित्र मंडळींना ही गोडी लावण्यासाठी दिवसरात्र मी झटू लागलो. उत्तम पुस्तकं वाचल्याचा फायदा या मित्रमंडळींना नक्कीच झाला. पुढे तर वाचक रसिकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे मी Booklet Guy नावाचे मोबाईल ऍप सुरु केले जे अँपल आणि अँड्रॉइड यांनी फ्री मध्ये वाचकांना उपलब्ध करून दिले. ‘मेक इंडिया रीड’ या माझ्या मिशनला फॉलो करणाऱ्यांची संख्या आता लाखांच्या घरात आहे. वर्षअखेपर्यंत ती कोटीपर्यंत जाईल याची खात्री मला आहे." एका मिनिटात दीडशे शब्द, एका दिवसात एक पुस्तक, आणि आत्तापर्यंत तब्बल १३५० पुस्तकांचे वाचन करणारा अमृत देशमुख मंचावरून उपस्थित मुलांशी, त्यांच्या पालकांशी आणि वाचकांशी संवाद साधत होता.
निमित्त होते, व्यास क्रिएशन्सच्या आणि थिएटर कोलाज यांच्या संयुक्त विद्यमाने सहयोग मंदिर मध्ये सजली अभिवाचनाची अभिनव मैफल. इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी या अभिवाचनामध्ये सहभागी झाले होते हे महत्वाचे. काही विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा गंध समजून, उमजून तो व्यासपीठावर सुंदरपणे सादर केला. अनेक विद्यार्थ्यांचे पालक या कार्यक्रमास उपस्थित होते. आपली मुले अगदी सहजपणे मराठीत, हिंदीत व्यक्त होत आहेत याचा आनंद आणि समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. थिएटर कोलाजच्या संस्थापिका, अभिनेत्री आणि उत्तम निवेदिका पल्लवी वाघ-केळकर आणि व्यास क्रिएशन्सचे सर्वेसर्वा निलेश गायकवाड यांना या कार्यक्रमाचे श्रेय निश्चितपणे जाते. वाघ यांनी सुरवातीस आपले मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाचा उद्देश आणि रूपरेषा समजून सांगितली. त्यानंतर निलेश गायकवाड यांनी व्यासची वाटचाल विशद केली. याचवेळी व्यास क्रिएशन्स यांनी अभिनव अश्या अक्षरठेव योजनेचा शुभारंभ केला. ठराविक रक्कम तीन वर्षासाठी व्यासपाशी ठेवल्यावर प्रतीवर्षी व्यास प्रकाशनाची पुस्तके वाचकांना दिली जातील, ती त्यांच्याच मालकीची होतील आणि तीन वर्षानंतर मूळ रक्कम ( प्रशासकीय खर्च वगळून ) वाचकाला परत केली जाईल.शुभारंभाच्याच दिवशी अनेक वाचक रसिकांनी या योजनेची माहिती करून घेतली आणि काही जणांनी तर रक्कम गुंतवून या योजनेचा लाभही घेतला. योजनेचा संपूर्ण तपशील व्यास क्रिएशनच्या कार्यालयात उपलब्ध आहे. यानंतर साहित्यिका डॉ. निर्मोही फडके यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी संवाद साधला. पालकांनी आपल्या मुलांना पुस्तकाकडे कसे वळवावे याबद्दल आपली भूमिका मांडली. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी या सर्वानीच आपली मातृभाषा टिकवणे, रुजवणे आणि वाढवणे हे किती आवश्यक आहे याबद्दल आपली मते मांडली. यानंतर मुलांचे सहजसुंदर असे अभिवाचन झाले. मराठीतले ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांची अभ्यास ही कथा, काठ का घोडा ही हिंदीतली कथा, तर लेखक मोहम्मद अशरफ खान यांची भुक्कड दादाजी ही कथा, बोबडी सुटली ही डॉ सुमन नवलकर यांची कथा यांचे अभिवाचन मंचावर झाले. त्यास पालकांचा आणि रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदिका वृंदा दाभोलकर यांनी केले तर सुजाता भिडे यांनी मान्यवरांचे आणि उपस्थितांचे आभार मानले.