ठाणे : अभिनेत्री मीरा चोप्रा हिचे बनावट ओळखपत्र तयार करून तिला बेकायदेशीरपणो लस देण्यात आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीचा अहवाल आता महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या अहवालावर आता विधी विभागाचा सल्ला घेतला जात असून त्यानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिली आहे.
लसीकरणासाठी यापुढे असे प्रकार घडू नयेत, यासाठी कोणत्याही खासगी संस्थेचे अशा प्रकारचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार नसून शासकीय यंत्रणेकडून देण्यात आलेले ओळखपत्रच, तेदेखील त्याची तपासणी करुनच पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे, यापुढे खाजगी संस्थेच्या ओळखपत्रवर लस दिली जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. मागील काही दिवसापूर्वी ठाणो महापालिकेच्या पार्कीग प्लाझा कोवीड सेंटरमध्ये अभिनेत्री मिरा चोप्रा हीने लस घेतल्याची माहिती समोर आली होती. तसेच तिच्याकडे ओम साई आरोग्य केअर प्रा. लि. या कंपनीचे ओळखपत्र असल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चार सदस्यीय समिती नेमली होती. या समितीच्या माध्यमातून चौकशी केली असता, त्यामध्ये आणखी २१ श्रीमंत तरुण, तरुणींना अशा प्रकारे ओळखपत्र तयार करुन देण्यात आल्याची माहिती समोर आली होती. तसेच त्यातील १५ जणांनी लस देखील घेतली असल्याचे समोर आले होते. त्यात आणखी एका अभिनेत्रीचा समावेश होता. परंतु तिने लस घेतली नसल्याचे या अहवालात नमुद करण्यात आले होते.
या प्रकरणात दोषी असलेल्या ओम साई आरोग्य केअर प्रा. लि. या कंपनीवर गुन्हा दाखल करावा आणि कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली होती. तसेच अहवाल सादर झाल्यानंतरही कारवाई होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला होता. दरम्यान, आता या प्रकरणी विधी विभागाचा अभिप्राय घेतला जात असल्याची माहिती आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिली आहे. परंतु यापुढे असे प्रकार घडू नयेत म्हणून कोणत्याही संस्थेचे ओळखपत्र तयार करुन घेऊन त्या माध्यमातून लस घेतली जात असेल तर ते यापुढे होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या खासगी संस्थेचे ओळखपत्र लस घेण्यासाठी ग्राह्य धरले जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. केवळ शासकीय यंत्रणोचे ओळखपत्र असेल तर त्याची पडताळणी करुन लस दिली जाईल असेही त्यांनी सांगितले आहे.