अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : घोडबंदर भागाला आजही पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याची गंभीर बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. त्यामुळे घोडबंदरच्या पाण्याचे नियोजन होत नाही तो पर्यंत ओसी देऊ नका असे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी शहर विकास विभागाला दिले आहेत. याशिवाय शहराला किती पाणी येते येते, किती पाणी नागरीकांना दिले जाते, पाण्याची चोरी, गळती किती आहे, यासंदर्भात पाण्याचे आॅडीट होणे अपेक्षित असतांना देखील त्याचे आॅडीट २००८ नंतर झालेच नसल्याची बाबही बुधवारी झालेल्या पाणी समस्येवरील जनसुनावणीत उघड झाली आहे.
पाण्याची समस्या सोडवण्यासाठी एक समिती स्थापन करून या समितीची महिन्यातून दोन वेळा बैठक घेण्याच्या अटीवर ठाण्यातील बांधकामांना परवानगी देण्याचे आदेश उच्च न्यायालयालयाने २०१७ मध्ये दिले होते.मात्र २०१७ साली स्थापन झालेल्या या तक्रार निवारण समितीच्या पाच वर्षात केवळ दोनच बैठका झाल्या होत्या. त्यानंतर बुधवारी महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या दालनात जनसुनावणी घेण्यात आली. या जनसुनावणीत घोडबंदर मधील अनेक नागरीकांनी हजेरी लावली होती. तसेच शहरातील इतर भागातील नागरीकांना देखील हजेरी लावली होती. यावेळी दक्ष नागरीक चंद्रहास तावडे यांनी शहरात पाण्याची समस्या असतांना त्याचे नियोजन कसे केले जाते, किती पाणी येते किती पाणी ठाणेकर नागरीकांना दिले जाते. पाण्याचा अपव्यय कशा पध्दतीने केला जातो, याची माहिती कशी मिळविली जाते. त्यासाठी पाण्याचे आॅडीट महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून केले जाते का? असा सवाल त्यांनी केला. मात्र २००८ नंतर पाण्याचे आॅडीटच झाले नसल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाºयांनी दिली. अखेर आयुक्त अभिजीत बांगर यांनी यापुढे दरवर्षी पाण्याचे आॅडीट करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता तरी पाण्याचे आॅडीट अशी अपेक्षा ठाणेकर नागरीक करीत आहेत.
दुसरीकडे घोडबंदर भागातील पाण्याची समस्या आजही सुटु शकलेली नसल्याचे वास्तव या जनसुनावणीत पुन्हा एकदा अधोरेखीत झाले. घोडबंदर भागाला मंजुर असलेल्या पाण्याचा कोटा मिळत नाही. अनेक भागात आजही कमी दाबाने पाणी पुरवठा केला जात आहे. काही ठिकाणी पाण्याची आजही बोंब आहे, वेळेवर पाणी येत नाही, आले तरी ते किती वेळ आहे, याची माहिती उपलब्ध नसते. त्यामुळे येथील गृहसंकुलांना दरमहा टँकरसाठी पाच ते सात लाखांचा नाहक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे वास्तव येथील रहिवासी उदय शृंगारपुरे यांनी अधोरेखीत केली.
पाण्याची समस्या सुटावी यासाठी २०१३ पासून प्रयत्न केले जात असतांना देखील अद्यापही या भागाची पाण्याची समस्या सुटली नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यातही, पाणी नसतांनाही या भागात नव्याने बांधकामे उभी होत आहेत, आधीच्या रहिवाशांना पाणी मिळत नसल्याने नवीन लोकांना पाणी कसे मिळणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यावर आयुक्त अभिजीत बांगर यांनी पाण्याचे योग्य नियोजन होत नाही, तोपर्यंत घोडबंदर भागात नव्या बांधकामांना ओसी न देण्याचे आदेश शहर विकास विभागाला दिले आहेत. परंतु पाणी समस्या केव्हा सुटणार यावर योग्य ते उत्तर मिळाले नसल्याने घोडबंदरकांची निराशा झाली.