डोंबिवली : लोकलने प्रवास करण्यापूर्वी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी पूर्वेला रेल्वेस्थानकाबाहेर राथ रोडवर दुचाकी पार्किंग करत असल्याने अन्य प्रवाशांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत होती. यासंदर्भात १६ जुलैला ‘लोकमत’च्या ‘हॅलो ठाणे’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत रेल्वे पोलिसांनी वाहतूक विभागाला पत्र, स्मरणपत्र देत तातडीने दुचाकींचे पार्किंग रोखण्याची मागणी केली होती. त्यानुसार, अखेर शुक्रवारी दुचाकींना रोखण्यासाठी रामनगर भागात बॅरिकेड्स लावण्यात आले.
राथ रस्त्यावर दुचाकी वाहने दिवसभर कशाही पद्धतीने उभी केली जात होती. त्यामुळे अन्य वाहने तसेच नागरिकांना येजा करण्यास अडथळा येत होता. आरपीएफ पोलिसांनीही याबाबत वाहतूक पोलिसांकडे तक्रार केली होती. यासंदर्भात सतत पत्र देऊनही कारवाई होत नसल्याने अखेर शुक्रवारी आरपीएफच्या जवानांनी वाहतूक पोलिसांची भेट घेत कारवाईसाठी आग्रह धरला. त्यानंतर, वाहतूक पोलिसांनी तातडीने रामनगर येथील तिकीट खिडकीसमोर बॅरिकेड्स लावून दुचाकींना राथ रोडवर येण्यास मज्जाव केला.
पाटकर पथ आणि उर्सेकरवाडीच्या गल्लीतही बॅरिकेड्स लावण्यात येणार आहे. राथ रस्त्यावर येणाऱ्या अन्य रस्त्यांची शनिवारी पाहणी करून दुचाकी पार्किंगला अटकाव करण्यात येणार आहे. त्यानुसार, सोमवारी सकाळपासून तेथे वाहने उभी राहणार नाहीत, असा प्रयत्न असल्याचे वाहतूक पोलीस म्हणाले. दुचाकी उभी केल्यास दुचाकीस्वारावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
रिक्षांचेही होतेय पार्किंग
लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून राथ रोडवर रिक्षाही उभ्या राहतात. त्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वाहने उभी करत असले, तरी भविष्यात सर्वजणच वाहने उभी करतील. त्यावेळी विचित्र स्थिती होईल. तसेच कारवाई करणे मोठे आव्हान ठरेल. त्यामुळेच आरपीएफने बेकायदा पार्किंगवर कारवाईची मागणी केली आहे.
टोइंग व्हॅन बंद असल्याने फटकावाहतूक पोलिसांची टोइंग व्हॅनही सध्या बंद आहे. त्यावर कार्यरत असणारे कर्मचारी कोरोनामुळे कामावर येत नाहीत. त्यातच, दुचाकी उचलण्यासाठी अन्य पर्याय नसल्याने वाहतूक पोलिसांची अडचण झाली आहे. त्यामुळे आता बॅरिकेड्स लावून जे आत प्रवेश करतील, अशा वाहनचालकांना दंड लावून शिस्तीचे पालन करावे, असे सूचित केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.