- सुरेश लोखंडे , ठाणेपावसाने हुलकावणी दिल्यामुळे भात लागवडीसह जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. उल्हास नदीसह बारवी धरणातील पाण्याचा पुरवठा १५ जुलैपर्यंत सुरळीत ठेवण्यासाठी फेबु्रवारीपासूनच जिल्ह्यातील पाच महापालिका, दोन नगरपालिकांमध्ये १४ टक्के पाणीकपात सुरू केली असता ती आजतागायत आहे. पावसाअभावी अद्याप या कपातीमध्ये जास्तीची वाढ होत नसल्यामुळे नागरिकांची या संकटातून काहीअंशी सुटका झाली आहे.प्रत्येक वर्षाचा अनुभव लक्षात घेऊन १५ जुलैपर्यंत पाऊस येत असल्यामुळे या कालावधीपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. पण, पाऊस लांबणीवर गेल्यामुळे सध्या ते कोलमडले आहे. पण, उल्हास खोऱ्यात जून महिन्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे उल्हास नदीसह बारवी धरणाखालील नद्यानालेही दुथडी भरून वाहत असल्यामुळे ते पाणी आजपर्यंतही टिकून आहे. त्या पाण्याचा वापर करणाऱ्या ठामपाच्या काही भागांसह कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, मीरा-भार्इंदर या मनपांसह एमआयडीसी, अंबरनाथ व कुळगाव-बदलापूर नगरपालिकांसाठी होत आहे. सध्या या भागात जास्तीची कपात लागू करण्याची गरज नाही. पण, नागरिकांनी आहे ते पाणी काटकसरीने वापरण्याची मानसिकता ठेवण्याची आवश्यकता असल्याचे कार्यकारी अभियंता संजय निकुडे यांनी सांगितले. मागील वर्षी पावसाचे प्रमाण चांगले असतानाही बारवी धरणात सुमारे १४ टक्के पाणीसाठा कमी असल्याचे निदर्शनात आले होते. या सुमारे ४८.६६ दशलक्ष घनमीटर पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी या धरणासह उल्हास नदीतून पाणीपुरवठा होणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील पाच महापालिका, दोन नगरपालिका आणि एमआयडीसीमध्ये आठवड्यातून एक दिवसाच्या पाणीकपातीचे धोरण करण्यात आले होते. यामुळे सुमारे एक हजार ३६५ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाण्याची बचत झाल्याने आजतागायत पाणीपुरवठा सुरू ठेवणे शक्य झाले आहे. वाढत्या लोकसंख्येकडून पाण्याचा मनमानी वापर केला जात आहे. त्यास आळा घालण्याची आवश्यकता आहे.
पाऊस नाही; तरीही वाढीव कपात नाही
By admin | Published: July 16, 2015 11:02 PM