डोंबिवली - ब्रेनडेड झालेल्या व्यक्तीचा श्वासोच्छवास हा थांबलेले असतो. परंतु, त्यांचे हृदय चालू असते. ब्रेनडेड झालेली व्यक्ती व्हेटीलेंटरवर जगत असते. व्हेटीलेंटर काढल्यावर ती दोन तासांपेक्षा जास्त काळ राहू शकत नाही. अशा व्यक्तीच्या नातेवाइकांना अवयव दानासाठी प्रेरित केले जाते. मात्र, नातेवाइकांकडून त्याला फारसा चांगला प्रतिसाद मिळत नाही. हा प्रतिसाद वाढवा, यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डोंबिवली शाखेतर्फे नुकताच डोंबिवली जिमखान्यात ‘दान की अदालत’ हा कार्यक्रम झाला.‘दान की अदालत’मध्ये डॉक्टरांना प्रतिकात्मक आरोपीच्या पिजाऱ्यात बसविले होते. यावेळी अभिरूप न्यायालायामार्फत प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून अवयव दानसारखा कठीण विषय अतिशय सहज व सोप्यारितीने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात आला. या वेळी हृदयप्रत्यारोपण सर्जन डॉ. अन्वय मुळे, किडनी प्रत्यारोपण सर्जन डॉ. हरेश डोडेजा, झेडटीसीसीच्या सुजाता अष्टेकर, लिव्हर प्रत्यारोपण सर्जन डॉ. गौरव गुप्ता, डॉ. चारूदत्त वैती आदींनी प्रश्नांची उत्तरे दिली. आयएमएचे राज्य अध्यक्ष मंगेश पाटे आणि न्युरोलॉजिस्ट डॉ. सुनील बंदिष्टी यांनी न्यायाधीश म्हणून काम पाहिले. डॉ. राहुल पंडित यांनी वकिलाची भूमिका पार पडली. डॉ. अर्चना पाटे, सचिव डॉ. वंदना धाकतोडे आदी मान्यवर उपस्थित होते.डॉक्टरांनी सांगितले, एखाद्या व्यक्तीने अवयवदानाची इच्छा व्यक्त करून उपयोग नाही. त्याने त्याविषयी नातेवाइकांनाही माहिती दिली पाहिजे. किंवा एखाद्या व्यक्तीने अवयवदानाचा फॉर्म भरला असेल पण त्यांच्या नातेवाइकाने त्यांच्या मृत्यूबाबत माहिती न दिल्यास अवयवदान होऊ शकत नाही. त्यात ही धार्मिक मान्यता यासारख्या गोष्टी आड येतात. त्यामुळे अवयवदानाबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. एखाद्या रुग्णाला आजी-आजोबा, आई-वडील असे नऊ प्रकारचे जवळचे नातेवाईक अवयव दान करू शकतात. पण त्याव्यतिरिक्त कोणी त्यांना अवयवदान करू इच्छित असेल तर त्यासाठी आॅथोरेशन कमिटीकडून तपासणी केली जाते. या समितीने परवानगी दिल्यास त्या व्यक्तीला अवयवदान करता येऊ शकते. मात्र, समितीची परवानगी नसेल तर अवयव दान करता येणार नाही, असे सांगितले.प्रतीक्षा यादी मोठीरोटो यांच्या अहवालानुसार महाराष्ट्रात २०१८ मध्ये हृदयाच्या प्रतीक्षेत ८८ रुग्ण होते. त्यापैकी ३४ रुग्णांना हृदय मिळाले आहे. किडनीच्या प्रतीक्षेत पाच हजारांहून अधिक रुग्ण आहेत. तर या वर्षात केवळ २०० रुग्णांना किडनी मिळाल्या आहेत. लिव्हरची एक हजारापेक्षा जास्त रुग्णांना गरज आहे आणि केवळ १२४ रु ग्णांना लिव्हर प्राप्त झाले आहे. फुफ्फुसची २६ जणांना गरज आहे. मात्र, आठ रुग्णांनाच ते मिळाले आहे. स्वादूपिंडची ३२ जणांना आवश्यकता आहे. या आकडेवारीवरून अवयव दानाची जागृती वाढण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
अवयवदानासाठी नातेवाइकांकडून प्रतिसाद नाही, डॉक्टरांनी व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 3:08 AM