- सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील कचरा उचळणाऱ्या कामगारांनी पगार झाला नसल्याच्या निषेधार्थ कामबंद आंदोलन सुरू केले. महापालिकेने कचऱ्याचे ढीग साचू नये म्हणून खाजगी जेसीबी मशीन व डंपरच्या सहाय्याने कचरा उचलण्यात येत असून कोणार्क कंपनीला नोटीस दिल्याची माहिती मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी यांनी दिली.
उल्हासनगर महापालिकेने शहरातील कचरा उचलण्याचा ठेका कोणार्क कंपनीला दिला. कचरा उचलण्यावर दिवसाला ४ लाख ४६ हजार, महिन्याला १ कोटी ३४ लाख रुपये व वर्षाला १५ कोटी पेक्षा जास्त खर्च महापालिका करते. कोरोना काळात महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याने, महापालिकेने कचरा उचळणाऱ्या कोणार्क कंपनीला गेल्या ३ महिन्या पासून पैसे दिले नाही. कोणार्क कंपनीने गेल्या ३ महिन्यापासून महापालिकाने पैसे दिले नाही. हे कारण पुढे करून कचरा उचळणाऱ्या ५५० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे वेतन दिले नाही. कामगारांचे ४ डिसेंबर रोजी पगार झाला नसल्याने त्यांच्यात असंतोष निर्माण झाला. कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या लढा कामगार संघटनेचे अध्यक्ष संदिप गायकवाड यांनी वेतन नाही, तोपर्यंत कामबंद अशी भूमिका घेतल्याने आज कामबंद आंदोलन केले.
कचरा उचळणाऱ्या कामगारांच्या कामबंद आंदोलनाने महापालिका प्रशासन हादरले. कामगारांच्या आंदोलनाने शहरात कचऱ्याचे ढीग साचू नये म्हणून महापालिका आरोग्य विभागाने ३ जेसीबी मशीन, ८ डंपर कचरा उचलण्यासाठी लावले.कोणार्क ठेकेदाराने गेल्या ३ महिन्याचे थगीत वेतन देण्याची मागणी केली. दरम्यान सोमवार पर्यंत कोणार्क कंपनीला पैसे देण्याचे संकेत महापालिका प्रशासनाने दिल्याने, कामगारांचा संप मागे घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महापालिका वर्षाला १५ कोटी पेक्षा जास्त रुपये कचरा उचलण्यावर खर्च करूनही, नागरिकांना ठेकेदार वेठीस धरत असल्याची प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.
शहरात कचऱ्याचे ढीग, अस्वच्छता
कचरा उचळणाऱ्या कामगारांनी कामबंद आंदोलन केल्याने, आज घरोघरी जाऊन कचरा उचलला गेला नाही. तसेच अनेक ठिकाणच्या कचऱ्याच्या कुंड्या ओव्हरफ्लॉ झाल्या असून सर्वत्र कचरा व अस्वच्छतेचे चित्र आहे.