लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : सध्या जिल्ह्यातील जलसाठ्यांत जूनअखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. त्यामुळे पाणीकपातीचे संकट नाही. पाऊस लांबल्यास पर्यायी पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्याचे आदेश ठाणे जिल्हा पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
बुधवारी ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडली. या बैठकीत त्यांनी हे आदेश दिले. ठाणे जिल्ह्यातील पाणीटंचाईचा विषय ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची दखल पालकमंत्र्यांनी घेतली.
जिल्ह्यातील जलसाठ्यांच्या स्थितीची माहिती देसाई यांनी जिल्हा प्रशासनाकडून घेतली. सर्व पलिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना यावेळी सूचनाही केल्या. तर वादळ, अतिवृष्टी, दरड कोसळल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणून वाहतूक सुरळीत करणे, या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागासह पोलिस यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. महिला बचत गट प्रक्रियेत न आलेल्या महिलांना प्रोत्साहित करणे, महिला बचत गटाचे सहकार्य वाढवणे ते काम पालिका, नगरपालिका क्षेत्र आणि ग्रामीण क्षेत्र करण्याचे नियोजन करावे, असेही देसाई यांनी सांगितले.
खर्चाचा नियमित आढावा घेणार
जिल्ह्यातील खर्चाचे नियोजन केले असून, वेळोवेळी कामांचा व खर्चाचा आढावा घेण्यात येणार आहे. जिल्हा नियोजनाचा खर्च १०० टक्के वेळेत कसा होईल, कामे वेळेत कशी सुरू होतील? वेळेत कशी पूर्ण होतील, दर्जेदार कशी होतील या सगळ्या गोष्टींकडे पालकमंत्री म्हणून माझे लक्ष असणार असल्याचे त्यांनी सांगितले.