आशीष राणे
वसई : वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वसई तालुक्यातील दोन धरणांमधील पाणीसाठा मार्चच्या पहिल्या आठवड्यातच खालावला असून जेमेतेम ३ महिने पुरेल इतकाच साठा त्यात शिल्लक आहे. तर पालघरमधील सूर्या-धामणी धरणातील साठा मुबलक असल्याने तो बहुतांश वर्षभर पुरेल असे आकडेवारीवरून दिसते. सूर्याधामणी धरणात ६३.३२ टक्के पाणीसाठा आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली.
वसई-विरार शहराला सूर्या-धामणी प्रकल्पातून १०० एमएलडी, सूर्या टप्पा-३ मधून १०० एमएलडी तर उसगाव २० एमएलडी आणि पेल्हार धरणातून १० एमएलडी पाणी म्हणजेच एकूण २३० एमएलडी पाणी प्रतिदिन मिळत आहे. परंतु आता मार्चचा पहिला आठवडा संपत आला आणि कडक उन्हे असून धरण क्षेत्रांत विजेचा लपंडाव सुरू आहे. याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर हळूहळू होत आहे. उसगाव व पेल्हारमध्ये जेमतेम ९० दिवस पुरेल इतका पाणीसाठा आहे. मार्च, एप्रिल व मे महिने मुळात पाणीकपातीचे. त्यात येथील धरणात पाणीसाठा कमी आहे. मात्र सूर्या-धामणीतील पाण्याचा विचार करून कपात होणार की नाही? हे पाणीपुरवठा विभागाने जरी स्पष्ट केले नसले तरीही पालिकेला धरण क्षेत्रात पाऊस पडेपर्यंत काटेकोरपणे पाण्याचे नियोजन करावे लागणार हे नक्की.
पथक फिरते करण्याची मागणीमहापालिकेने धरणातील पाण्याच्या पातळीचे निरीक्षण करून आणि शहरात होणारी पाण्याची गळती रोखण्यासाठी अभ्यासपूर्ण नियोजन करणे आवश्यक आहे, अन्यथा हजारो लाखों लीटर पाणी वाया जाईल. महापालिकेने गळती प्रतिबंधक पथक तयार करून ते ठिकठिकाणी फिरते ठेवले पाहिजे, अशी मागणी काही नागरिक करत आहेत.
४ मार्च २०२१ पर्यंतच्या आकडेवारीनुसार पाणीसाठा
पालघरच्या सूर्या-धामणी धरणात २७६.३५ घनमीटर दशलक्ष लिटर म्हणजे ६३.३२ टक्के साठा आहे. वसईच्या उसगावमध्ये ४.९६ घनमीटर दशलक्ष म्हणजे ५८.६७ टक्के साठा आहे. तर पेल्हार धरणात ३.५६ दशलक्ष घनमीटर इतका अर्थात ५०.९३ टक्के पाणीसाठा आहे.