लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळत आहे. त्यातही प्रतिबंधात्मक लसीकरण हाती घेतले असले तरी गैरसमज आणि अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ग्रामीण आदिवासी, ग्रामस्थांनी या लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे. त्यात आता तिसरी लाट येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यास रोखण्यासाठी ग्रामीण भागात विविध उपाययोजनांचे अद्यापही नियोजन दिसत नाही. ना टेस्टिंग, ना लसीकरण मग तिसरी लाट ग्रामीण भागात कशी रोखणार अशा शंका, कुशंका जाणकारांकडून व्यक्त केल्या जात आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागात आतापर्यंत २९ हजार ३६४ रुग्ण सापडलेले आहेत. या रुग्णांमधील २५ हजार ७०९ जणांत उपचारानंतर सुधारणा झाली आहे. कोरोनामुक्त होण्याचे हे प्रमाण ८७.५५ टक्के आहे. बचावासाठी तब्बल ५७ हजार २७४ जणांनी स्वॅब तपासणी केलेली आहे. यात सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांपैकी आतापर्यंत ७३० जणांचा मृत्यू झालेला आहे. जिल्ह्यातील या मृत्यूंचे प्रमाण २.४९ असे आहे. जिल्ह्यातील गावागावांमधील घरात आजपर्यंत क्वारंटाइन झालेल्यांमध्ये ४२ हजार २८३ ग्रामस्थांचा समावेश आहे. यामुळे घरात १४ दिवस विलगीकरणात राहून बरे झालेल्या ३६ हजार १५१ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
जिल्ह्यात सध्या स्थितीला दोन हजार ९२५ रुग्ण ठिकठिकाणी उपचार घेत आहेत. यापैकी एक हजार ८६९ जण घरात राहूनच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहेत. जिल्ह्याबाहेरील रुग्णालयात ७५ जण उपचार घेत आहेत. तर वेगवेगळ्या रुग्णालयात ९८१ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. याशिवाय या ग्रामीण भागातील रहिवासी असलेले पण शहरात ऑक्सिजनवर उपचार घेत असलेल्या तब्बल ९५ रुग्णांचा समावेश आहे. तर गंभीर आजारी असल्यामुळे सहा जणांवर व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत. यामुळे ग्रामीण भागातील रहिवासी कोरोनाच्या आजाराने मेटाकुटीला आले आहे. त्यात गैरसमज असल्यामुळे बहुतांशी ग्रामस्थ उपचारापासून लांब जात आहे. त्यांच्यातील हा गैरसमज दूर करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू केली आहे. त्यांच्या बोली भाषेत गावोगाव प्रचार सध्या रंगलेला आहे. मात्र, आगामी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने काय नियोजन केले, याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, यासंबंधी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह आरोग्य अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
-- -----------------