डोंबिवली : संशोधन क्षेत्रात यश मिळवणे फार कठीण आहे. एखाद्या रोगावरील एक गोळी तयार करण्यासाठी १४-१५ वर्षे अहोरात्र काम करावे लागते. फार्मासिस्ट आपले काम करतो. त्यानंतर प्रयोगशाळेत त्याची तपासणी केली जाते. औषधाच्या एका गोळीला पहिल्या टप्प्यातून जायलाच पहिल्या पाच वर्षांचा कालखंड जावा लागतो. काही संशोधक निवृत्त होतात. पण त्यांच्या नावावर एकही पेटंट असते नाही. त्यामुळेच या क्षेत्राकडे फारसे कोणी वळत नाही, अशी खंत संशोधक डॉ. कल्पना जोशी यांनी व्यक्त येथे केली.‘सुभेदारवाडा कट्ट्या’तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त ड्रग डिस्कव्हरी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व विविध असाध्य आजारांवरील औषधांचे आंतरराष्ट्रीय पेटंट मिळवणाऱ्या कर्तृत्ववान महिला डॉ. कल्पना जोशी यांच्याशी शनिवारी संवाद साधण्यात आला. सुभेदारवाडा शाळेत झालेल्या या कार्यक्रमात अनुश्री फडणीस यांनी त्यांना बोलते केले.जोशी म्हणाल्या, की एखादे औषध कितीही परिणामकारक असले तरी त्याला पेटंट मिळवणे गरजेचे आहे. पेटंट नसेल तर त्या औषधाचा काहीही उपयोग होत नाही. आज ही मला खूप अभ्यास करावा लागतो. कॉन्फरन्सला जाणे किंवा जगात काय सुरू आहे, ते पाहावे लागते. उदा. एचआयव्ही या रोगावर काय काम सुरू आहे, याची माहिती ठेवावी लागते. बऱ्याच ठिकाणी प्रेझेंटशन असतात. रिसर्च हे माझे पॅशन आहे. संशोधक झाले नसते तर शेफ झाले असते. सामान्य लोकांना कॅन्सरची खूप भिती वाटते. काही वेळा घाबरण्याची गरज नसते. काही वेळा पेशंट त्यातून बरा ही होतो. एखाद्या बरा होणारा नसला तरी तेथे जाऊन त्यांचे मनोधर्ये वाढवण्याचे काम मी करते. जे आयुष्य हातात आहे, ते त्यांना कसे चांगले प्रकारे जगता येईल, या विषयी मार्गदर्शन मी करते.२००५ मध्ये राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम माझ्या प्रयोगशाळेत आले होते. तेव्हा ते म्हणाले होते की, स्वातंत्र्योत्तर काळात संशोधनात आपण म्हणावी, तशी प्रगती केलेली नाही. त्यामुळे संशोधनाची जगाला खूप गरज आहे. आपल्याला एखाद्या संशोधनाची कॉपी करायची असेल तरीही संशोधन करणे गरजेचे आहे. पालकांना केवळ मेडिकल आणि इंजिनियरिंग ही दोनच क्षेत्रे माहीत आहेत. पण त्यांनी आपल्या मुलांना संशोधन क्षेत्रात पाठवले पाहिजे. आपल्या मुलांमधील चमक ओळखा आणि त्याच क्षेत्रात जाण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या, असा सल्ला देखील त्यांनी दिला. आपले संशोधन कोणत्या स्टेजला जाते, हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. संशोधन ही देखील एक कला आहे. कोणत्याही कला म्हटली की त्यात ‘आयडिया’ ही ओघाने येते. कोणतेही संशोधन ‘आयडिया’शिवाय पुढे जाऊ शकत नाही. शास्त्रज्ञ हा नेहमी मन व बुध्दीपैकी केवळ बुध्दीचे ऐकत असतो. परदेशातील व आपल्याकडील जीवनपद्धतीत खूप फरक आहे. परदेशात खूप हळूवार व सावकाश काम केले जाते. आपल्याकडे प्रवासात अधिक वेळ जातो. तेथील महिला आरोग्याबाबत सर्तक आहेत. त्या वर्षातून एखादा आरोग्य तपासणी करतात. (प्रतिनिधी)
संशोधनाकडे फारसे कोणी वळत नाही
By admin | Published: March 15, 2017 2:19 AM