जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : सर्वोच्च न्यायालयाने रात्री ८ ते १० या वेळेत फटाके फोडण्यास परवानगी दिल्यानंतर पोलिसांनीही त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश संबंधितांना दिले होते. या पार्श्वभूमीवर ठाण्यात दिवाळीच्या दिवसांमध्ये फटाक्यांचा आवाज यंदा मंदावल्याचे चित्र पाहायला मिळाले. विशेष म्हणजे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ३४ पोलीस ठाण्यांपैकी एकाही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.वसुबारसपासून सुरू होणा-या दिवाळी सणात धनतेरस, नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाक्यांचा आवाज पहाटेपासूनच सुरू होतो. नरकचतुर्दशीला अभ्यंगस्रानानंतर पहाटेच फटाके वाजवण्याचीही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून आहे. त्यानंतर, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी व्यापारी तसेच नोकरदार मंडळी सायंकाळी ७ ते ११ या दरम्यान हमखास फटाके वाजवतात. यंदा मात्र न्यायालयाच्या निर्बंधामुळे पोलिसांनीही कारवाईसाठी कंबर कसल्यामुळे अनेकांनी फटाके न वाजवण्यातच शहाणपण ठेवले. काहींनी फटाके वाजवणारच, अशी री ओढली. पण, ही टक्केवारी अगदी नगण्य होती. बहुतांश मंडळींनी न्यायालयाचा मान राखल्याचे पाहायला मिळाले. ठाणे शहर, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळांतील ३४ पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील ३४ गस्ती पथकेही अशा फटाके वाजवणा-यांवर नजर ठेवून होती. पण, नियमांचे उल्लंघन करून फटाके वाजवणारे कुणीही आढळले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. एरव्ही, नौपाड्यासारख्या ठाणे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी फटाके फोडणा-यांची संख्या मोठी आहे. पण, यंदा तो आवाज जाणवलाच नाही. त्यामुळे कारवाई किंवा गुन्हा दाखल होण्याचा प्रश्नच नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी सांगितले.
‘‘संपूर्ण ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात फटाके विहित वेळेमध्ये वाजवण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी विशेष गस्ती पथकेही नेमली होती. नागरिकांनी पोलीस, सामाजिक संस्था आणि न्यायालयाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. त्यामुळे आयुक्तालयात बुधवारपर्यंत एकही गुन्हा दाखल झालेला नव्हता.’’सुखदा नारकर, जनसंपर्क अधिकारी, ठाणे शहर पोलीस आयुक्तालयफटाक्यांचे प्रमाण घटले, यात दुमत नाही - डॉ. बेडेकर
‘‘दरवर्षीच्या तुलनेत यंदा फटाक्यांच्या आवाजाचे प्रमाण ब-यापैकी कमी झाले आहे. यात दुमत नाही. सकाळच्या वेळी सर्वसाधारण ५० ते ७० हे आवाजाचे डेसिबल एरव्ही असते. आता अगदी नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही आवाजाची ही पातळी नौपाडा तसेच हिरानंदानीसारख्या भागात ५५ ते ६५-७० अशी नोंदली गेली. ध्वनिप्रदूषणाविरुद्ध केलेल्या जनजागृतीचाही हा सकारात्मक बदल आहे. फटाक्यांचा आवाज कमी होण्याचे प्रमाण यंदा ३० ते ४० टक्के आहे. समाजमन बदलत आहे. ही जमेची बाजू आहे. आणखी बदल अपेक्षित आहे.’’डॉ. महेश बेडेकर, सामाजिक कार्यकर्ते, ठाणे