शहापूर : शहापूरमध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत वाढली आहे. गेल्या दोन दिवसात २५ जणांचा कुत्र्यांनी चावा घेतला आहे. या मध्ये चार वर्षाच्या चिमुरडीपासून ते ६५ वर्षाच्या वृद्धाचा समावेश आहे. दोन ते तीन रु ग्ण वगळता अन्य गंभीर रुग्णांना ठाण्यातील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.शहापूरमधील पठाण वाडा, गंगारोड परिसर, शिवाजी चौक, देशमुखवाडी, खालचा नाका आदी ठिकाणी रात्रंदिवस भटकी कुत्री टोळक्याने फिरताना दिसतात. दुचाकीचा पाठलाग करून चावा घेणे व रस्त्यावरून चालणाऱ्यांच्या अंगावर धावत जाऊन चावा घेणे असले प्रकार वाढले आहेत. यामुळे काही दुचाकीस्वारांचा अपघातही झाला आहे. कुत्र्यांच्या या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नगरपंचायतीने या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या संदर्भात उपनगराध्यक्ष सुभाष विशे यांना विचारले असता ते म्हणाले की, या संदर्भात नागरिकांच्या तक्र ारी आल्या असून लवकरच भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत ठोस उपाययोजना करण्यात येईल.
शहापूरमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 10:37 PM