डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेने कोट्यवधी रुपयांच्या नालेसफाईच्या कामाला लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच मंजुरी दिली होती. मात्र, पावसाळा तोंडावर आला तरी ही कामे सुरू झालेली नाहीत. प्रशासनाच्या या ढिम्म कारभाराविरोधात मनसेने दंड थोपटले आहेत. कोपर रेल्वेस्थानकानजीक असलेल्या नाल्याची अजूनही सफाई झालेली नाही. त्यामुळे मनसेने या नाल्याचे ‘महापौर नाला’ असे नामकरण करत उपरोधिक आंदोलन केले.
महापालिका हद्दीत ४२ मोठे नाले आहेत. प्लास्टिक पिशव्या सर्रासपणे या नाल्यात टाकल्या जातात. नाल्यातील गाळ पावसाळ्याशिवाय वर्षभरात कधीच काढला जात नाही. पावसाळ्यात नालेसफाईसाठी महापालिकेने कोट्यवधींची तरतूद केली आहे. प्रत्यक्षात नालेसफाईची कामे केली जात नाहीत. नालेसफाईच्या कामात भ्रष्टाचार केला जातो, असा आरोप नुकताच कल्याण पूर्वेतील आमदार गणपत गायकवाड यांनी केला होता. नालेसफाईच्या कामाची पाहणी करण्यासाठी आयुक्त गोविंद बोडके आले असताना जेसीबीचालकाच्या केबिनचा ताबाच गायकवाड यांनी घेतला होता. त्यानंतर आता रखडलेल्या नालेसफाईच्या मुद्द्याकडे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी लक्ष वेधले आहे. महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजप पक्ष हे विविध विकासकामांचे श्रेय घेण्यास आघाडीवर असतात. एकमेकांमध्ये चढाओढ दिसते. त्याचप्रमाणे न झालेल्या नालेसफाईची नैतिक जबाबदारीही सत्ताधारी पक्षांनी स्वीकारावी, असा मुद्दा कदम यांनी उपस्थित केला आहे.कोपर स्टेशनकानजीकचा नाला गाळाने व प्लास्टिकच्या पिशव्यांनी भरलेला आहे. या नाल्याचे कामही अर्धवट स्थितीत आहे. तुंबलेल्या या नाल्यामुळे या परिसरातील नागरिक आणि रेल्वे प्रवाशांचे नाकही मुठीत आहे. या नाल्याचे ‘महापौर नाला’ असे नामकरण केल्याने किमान त्या नावाखातर तरी नाल्याची तातडीने सफाई होईल. यामुळे या उपरोधिक स्वरूपाच्या आंदोलनाचा घाट मनसेने घातला आहे. नाला जोपर्यंत स्वच्छ केला जात नाही, तोपर्यंत आजपासून या नाल्याचे नाव ‘महापौर नाला’ असे ठेवल्याचे कदम यांनी सांगितले.पाहणीदौरा अचानक रद्दमहापौरांकडून नालेसफाईची पाहणी शुक्रवारी केली जाणार होती. मात्र, महापालिकेतील कर्मचाऱ्याचे अपघाती निधन झाल्याने हा पाहणीदौरा अचानक रद्द करण्यात आला होता.