सुरेश लोखंडे
ठाणे : अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे अन्य शाळांमध्ये करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने ५८ प्राथमिक शिक्षकांना आदेश देऊन नवी मुंबई महापालिकेकडे पाठवले. परंतु गुजराती, हिंदी व उर्दू भाषीक माध्यमांच्या शाळांनी या मराठी भाषीक सुमारे ३२ शिक्षकाना हजर करून घेतले नाही. यामुळे चिंताग्रस्त असलेले हे शिक्षक दिवाळीतही शिक्षण विभागाकडे फेऱ्या मारताना आढळले.विद्यार्थी संख्ये अभावी जिल्ह्यातील बहुतांशी शाळांमध्ये शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. त्यांचे जिल्ह्यातील अन्य शाळांमधील रिक्त जागी समायोजन करणे अपेक्षित आहे. सुमारे दीड वर्षांपासून अतिरिक्त असलेल्या या शिक्षकाना आर्थिक समस्येसह विविध समस्यांना सामारे जावे लागत आहे. शिक्षण विभागाचे उंबरठे झिजवून अखेर दिवाळीच्याआधी त्यातील सुमारे ५८ शिक्षकांचे समायोजन नवी मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला. तसे आदेशही संबंधीत शिक्षकाना दिले. त्यातील केवळ २६ शिक्षकांचा स्विकार करीत उर्वरित ३२ शिक्षक नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने नाकारले. भाषीक माध्यमांची समस्या उभी राहिल्यामुळे या मराठी भाषीक शिक्षकांनी दिवाळी देखील चिंतग्रस्त अवस्थेत घालवली आहे.जिल्हा परिषदेने पाठवलेले शिक्षक मराठी भाषीक माध्यमाचे आहेत. त्यातील आवश्यकतेप्रमाणे नवी मुंबई महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळांनी २६ शिक्षकांना हजर करून घेतले. उर्वरित १८ शिक्षकाना गुजराती माध्यमांच्या शाळांनी नाकारले. याच प्रमाणे हिंदी भाषीक व उर्दूभाषीक माध्यमांच्या शाळांनी देखील १४ शिक्षकाना हजर करून घेतले नाही. जिल्हा परिषदेचे समायोजनाचे आदेश असतानाही सुमारे ३२ शिक्षकाना नवी मुंबई महापालिकेने हजर करून घेतले नाही, या वृत्तास जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी दुजोरा दिला. मात्र या शिक्षकांचे समायोजन करून घेण्याच्या मागणीसाठी आमचे शिष्टमंडळ नवी मुंबई महापालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याचे ही त्यांनी लोकमतला सांगितले.