ठाणे : अंगणवाडीसेविकांचे मानधन रखडल्यामुळे त्यांची उपासमार सुरू आहे. जून महिन्यापासून मानधन न मिळाल्यामुळे संतापलेल्या या सेविका सोमवारपासून शासनाविरोधात असहकार आंदोलन छेडणार आहेत. काम करूनही त्याचा अहवाल या सेविकांकडून या कालावधीत शासनास दिला जाणार नाही. तर, ६ ऑगस्टला मंत्रालयावर छत्री मोर्चा काढून त्या शासनाचे लक्ष वेधणार आहेत.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील अंगणवाडीसेविका या असहकार आंदोलनात सहभागी होणार आहेत. जून महिन्याच्या मानधनाची रक्कम तातडीने देण्याचे आदेश होऊनही त्यांना आजपर्यंतही मानधन मिळालेले नाही. तुटपुंजे मानधन मिळत असूनही ते वेळेवर देण्यासाठी शासन गांभीर्याने घेत नाही. वरिष्ठांकडून आदेश होऊन मानधन वेळेवर मिळत नाही. यामुळे सेविकांची उपासमार होत असून त्यांना आर्थिक समस्येमुळे विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यावर वेळीच उपाययोजना म्हणून मानधनाच्या रकमेचा निधी त्वरित वितरित करण्यात यावा आणि ठिकठिकाणच्या सेविकांचे मानधन देण्याचे नियोजन करावे, या मागणीसह अन्यही प्रलंबित मागण्यांसाठी सेविका असहकार आंदोलन छेडणार आहे. काम करूनही सेविका त्या कामांचे अहवाल २२ जुलैपासून शासनास देणे बंद करणार आहे.
मंत्रालयावर काढणार मोर्चामुंबई व ठाणे परिसरातील अंगणवाडीसेविका ६ ऑगस्टला मंत्रालय व आझाद मैदानावर छत्री मोर्चा काढणार आहेत.मानधन वेळेवर देण्यासाठी आंदोलनाचा निर्णय घेतल्याचे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी सांगितले.