सदानंद नाईक, उल्हासनगर: स्थानिक साई पक्ष व भाजपाच्या दोस्ती कार्यक्रमात भाजपा शहराध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या विधानावर शिंदेसेनेने आक्षेप घेतला आहे. रामचंदानी आपले अपशब्द मागे घेत नाहीत, तोपर्यंत असहकार्याची भूमिका घेणार असल्याचा पवित्रा शिंदेसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.
उल्हासनगर मतदारसंघातून महायुतीकडून भाजपाचे कुमार आयलानी रिंगणात आहेत. स्थानिक साई पक्षाने आयलानी यांना पाठिंबा देऊन भाजपा व साई पक्ष दोस्तीचा कार्यक्रम रविवारी रिजेन्सी हॉल येथे झाला. या कार्यक्रमात भाजपा शहर जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी मुख्यमंत्र्यांबाबत एक विधान केले. त्यावरून वाद निर्माण झाला आहे.
रामचंदानी यांनी केलेल्या विधानावर शिंदेसेनेचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यासह अन्य जणांनी आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली. रामचंदानी हे नेहमी वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध असून भाजपाने त्यांना वेळीच समज द्यावी, अन्यथा स्थानिक शिंदेसेना असहकार्याची भूमिका घेईल, असा इशारा चौधरी यांनी दिला. पक्षातील पदाधिकारी वादग्रस्त विधान करत असून शिंदेसेनेच्या भूमिकेमुळे कुमार आयलानी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
दुपारी चार वाजता उठणारे मंत्रालयात कधी जाणार?
भाजपाचे उमेदवार कुमार आयलानी हे पक्ष व आमदार कार्यालयात नागरिकांच्या सेवेसाठी हजर असतात. तसेच त्यांचा मोबाईल २४ तास सुरु असतो. तर दुसरा प्रतिस्पर्धी उमेदवार दुपारी ४ वाजता झोपेतून उठतो. मग तुम्हाला कधी भेटणार व मंत्रालयात कसा जाणार? असा प्रश्न भाजपा शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी साई-भाजप दोस्ती कार्यक्रमात उपस्थितांना करून ओमी कलानी यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. तर कुमार आयलानी यांनी स्वतःवर किती गुन्हे आहेत, हे सांगण्यात धन्यता मानणारा, तुम्हाला चांगले प्रशासन देणार का? असा प्रश्न यावेळी केला.