कल्याण : पश्चिमेतील वसंत व्हॅली परिसरातील नारायणा स्कूलमधील काही विद्यार्थ्यांनी शालेय फी न भरल्याने त्यांना वर्र्गाबाहेर बसविल्याची घटना उघडकीस आली आहे. यासंदर्भात पालकांनी सांगितले की, शाळा व्यवस्थापनाने अचानक फीवाढ केली असून, ती अन्यायकारक आहे. वाढीव फी कमी करण्याची मागणी पालकांनी शाळा व्यवस्थापनाकडे केली होती. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. बुधवारी फी न भरलेल्या विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढत शाळेच्या लायब्ररीत बसविले. याप्रकरणी आम्ही शाळेकडे जाब विचारला असता फी भरा मग बोलू, असा सल्ला आम्हाला देण्यात आला.
दरम्यान, पालकांना त्यांच्या मुलांचा प्रवेश घेताना तीन वर्षे फीवाढ करणार नाही, असे शाळेने सांगितले होते. फीवाढ करावीच लागल्यास पाच टक्के केली जाईल. आता अचानक ४० टक्के फीवाढ करण्यात आली आहे. पालकांनी यासंदर्भात पत्रकारांना माहिती दिली. त्यावर पत्रकारांनी शाळा व्यवस्थापनाची बाजू घेण्याचा प्रयत्न केला असता शाळेने पत्रकारांना शाळेच्या आवारात येण्यास मज्जाव केला. तसेच मुख्याध्यापकांचा मोबाइल नंबर देण्यासही नकार दिला. त्यामुळे फीवाढीसंदर्भात शाळेची बाजू समजू शकलेली नाही.याप्रकरणी पोलिसांकडे विचारणा केली असता त्यांनी शाळेला समज दिली आहे. पालक व शाळा व्यवस्थापनाने चर्चा करून हा प्रश्न सोडवावा. त्याचा त्रास विद्यार्थ्यांना होऊ नये, अशी सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.