शशिकांत ठाकूर, कासाडहाणू तालुक्यातील चंद्रनगर जिप शाळेच्या ‘न पेटणारी झोपडी’ या प्रकल्पाची राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. आदिवासी जीवन शैलीवर आधारीत विद्यार्थ्यांनी तयार केलेला हा प्रकल्प १३ ते १९ डिसेंबर दरम्यान बंगलोर येथे होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात मांडला जाणार आहे. तालुक्यातील चंद्रनगर या शाळेचा न पेटणारी झोपडी हा प्रकल्प पालघर जिल्हा परिषद आयोजित विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रथम क्रमांक मिळवून बारामती येथील राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी पाठविण्यात आला होता. त्यातून या प्रकल्पाची राष्टीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली होती. त्यानुसार राष्ट्रीय विज्ञान संस्था नागपूर यांनी वर्षभरात वेगवेगळया तपशिलामध्ये माहिती मागविली होती. त्या माहितीचा शाळेतील पदवीधर शिक्षक शैलेश राऊत यांनी पाठपुरावा केला त्या त्यानुसार राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मार्फत बंगलोर येथे होणाऱ्या २०१६ राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात त्याची सादरीकरणासाठी महाराष्ट्रातून निवड झाली आहे. राष्ट्रीय प्रदर्शनात सहभागी होणारी पालघर जिल्हयातील चंद्रनगर ही पहिली शाळा आहे. आदिवासी विद्यार्थीनी नम्रता भुसारा हिने हा प्रकल्प तयार केला असून प्रदर्शनीय वस्तूची मांडणी व मार्गदर्शन शाळेतील शिक्षक लहानू वरगा, जगन धोडी, व शैलेश राऊत यांनी केले आहे. या प्रकल्पाचे आदिवासी जीवनशैलीतील अत्यंत महत्वपूर्ण असणारी गवताची झोपडी हा घटक असून तिच्यावर युरिया खत व पाणी यांचे मिश्रण फवारले आहे. या मिश्रणाचा आगीशी संपर्क आल्यास वाढणाऱ्या तापमानामुळे अमोनिया वायू तयार होतो. अमोेनिया वायूमुळे ज्वलनास लागणारा आॅक्सिजन आगीपर्यंत पोहचू शकत नाही. त्यामुळे झोपडीचा आगीपासून बचाव होतो. या वैज्ञानिक तत्वावर हा प्रकल्प आधारीत आहे. हा प्रकल्प जंगलात लागणारे वणवे व त्या वणव्यात मृत्यूमुखी पडणारे आदिवासी बांधव, त्यांचे सर्वस्व असणारी झोपडी जळून खाक होते त्यामुळे नैराशाने तयांची प्रगती खुंटते असे वास्तव चित्र सदर प्रकल्पात उभारले आहे. सर्वस्तरातून या शाळेचे कौतुक होत आहे.
‘न पेटणारी झोपडी’ गेली राष्ट्रीयस्तरावर
By admin | Published: November 07, 2016 2:31 AM