नोटाबंदी म्हणजे सामान्य जनतेचा खून, काँग्रेसचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 05:48 AM2018-11-13T05:48:11+5:302018-11-13T05:49:03+5:30
मुजफ्फर हुसेन : भार्इंदर येथे काँग्रेसचे आंदोलन; जिल्ह्यातही ठिकठिकाणी आयोजन
मीरा रोड/भार्इंदर : नोटाबंदी हा देशाच्या इतिहासातील सर्वात चुकीचा निर्णय होता. त्यामुळे सर्वसामान्यांचा नव्हे, तर अंबानी, अदानींचा फायदा झाला. देशाचा चौकीदारच चोर असून नोटाबंदी म्हणजे सामान्य जनतेचा एक प्रकारे खून होता, असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस तथा माजी आमदार मुजफ्फर हुसेन यांनी भार्इंदर येथे नोटाबंदीच्या निषेधार्थ काँग्रेसने केलेल्या आंदोलनात केला.
नोटाबंदीच्या निषेधार्थ हुसेन यांच्या नेतृत्वाखाली भार्इंदर (पू.) काँग्रेस कार्यालयापासून गोडदेव नाक्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा सरकारविरोधात कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. शास्त्रोक्त पद्धतीने मोदी सरकारचे श्राद्ध यावेळी घालण्यात आले. जिल्हाध्यक्ष अनिल सावंत, गटनेने जुबेर इनामदार, महिला जिल्हाध्यक्षा लीला पाटील, नगरसेवक राजीव मेहरा, नगरसेविका गीता परदेशी, सारा अक्रम, अॅड. शफिक खान, विकास म्हात्रे, अंकुश मालुसरे, राजकुमार मिश्रा, संदीप चौहान, प्रकाश नागणे आदी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. नोटाबंदीच्या दोन वर्षांनंतरही जनता, लहान उद्योजक, व्यापारी वाईट परिस्थितीमध्ये आहेत. रोजगार, व्यवसाय बुडाले. लोकांचे बळी गेले. त्यांची दिवाळी काळी ठरली. राफेल घोटाळा हजारो कोटींचा असून केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयालासुद्धा विमानाची किंमत सांगायला तयार नाही. चार वर्षे सत्ता असताना राम मंदिर बांधले नाही. आता निवडणूक आली की, मंदिराचा मुद्दा उभा करून सरकार तेढ वाढवत असल्याचा आरोप मुजफ्फर हुसेन यांनी यावेळी केला.
शहापूरमध्ये काँग्रेसचे निषेध आंदोलन
शहापूर : मोदी सरकारने देशात लागू केलेल्या नोटाबंदीला दोन वर्षे पूर्ण झाली असून या फसलेल्या निर्णयाचा जाब विचारण्यासाठी सोमवारी शहापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुकाध्यक्ष तथा सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष महेश धानके यांच्या नेतृत्वाखाली निषेध करण्यात आला.
या निर्णयामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले, तर हजारो लोक बेरोजगार झाले, तर जीडीपी दरसुद्धा कमी झाला, याचा जाब विचारण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या आदेशाने शहापूर तालुका काँग्रेस कमिटीने तहसीलदार रवींद्र बावीस्कर यांना नोटाबंदीविरोधात निवेदन दिले.