- प्रज्ञा म्हात्रे ठाणे : थरांबाबत गोविंदा पथकांना दिलासा देणारा निकाल उच्च न्यायालयाने दिल्यानंतरही यंदाच्या दहीहंडी उत्सवात सहभागी होणाºया गोविंदा पथकांच्या संख्येत घट झाली आहे. उत्सव अवघ्या चार दिवसांवर आला असला, तरी गोविंदा पथकांना पुरेसे प्रायोजक मिळत नसल्याने यंदा अनेक गोविंदा पथकांनी माघार घेतल्याचे दहीहंडी समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.दोन वर्षांपासून आयोजकांची घटलेली संख्या आणि यंदा गोविंदा पथकांना मिळत नसलेले प्रायोजकत्व यामुळे यावर्षीच्या उत्सवात जवळपास १२५ ते १३० गोविंदा पथकेच सहभागी होण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या निर्णयाआधी २०० गोविंदा पथकांनी उत्सवात उतरण्याची तयारी दाखविली होती. परंतु मोजकेच दिवस राहिल्याने आणि प्रायोजक मिळणे कठीण झाल्याने बहुतांश पथकांनी माघार घेतल्याची नाराजी महाराष्ट्र गोविंदा पथक समन्वय समितीचे सचिव समीर पेंढारे यांनी व्यक्त केली.गेल्यावर्षी महापालिकेच्या निवडणुकीमुळे गोविंदा पथकांना प्रायोजकत्व मिळाले होते. त्यामुळे जवळपास १६० गोविंदा पथके उतरली होती. यंदा मात्र उलट परिस्थिती आहे. दरवर्षी उत्सवात सहभागी होणारी बहुतांश गोविंदा पथके प्रायोजकत्वाच्या शोधात आहेत. भोजन, प्रवास, टी शर्ट, विमा आदींचा खर्च पथकांना करावा लागतो. पाच ते सहा थर लावणाºया पथकाला किमान सव्वा लाख ते दीड लाख खर्च आणि त्यापेक्षा अधिक थर लावणाºया गोविंदा पथकांचा खर्च अडीच लाखांवर जातो. प्रायोजकांची वानवा असल्याने पथकाचा खर्च भागणार कसा, असा सवाल गोविंदा पथकांपुढे ठाकला. खर्चाचे गणित सुटत नसल्याने बहुतांश गोविंदा पथकांनी यंदा उत्सवात न उतरण्याचा निर्णय घेतला असल्याचे समन्वय समितीच्या पदाधिकाºयांनी सांगितले.
भोजनाची व्यवस्थागोविंदा पथकांवरील खर्चाचा एक भार कमी करण्यासाठी ठाणे-मुंबईतील गोविंदा पथकांसाठी ओम साईराज अन्नछत्र मित्र मंडळाने भोजनाची व्यवस्था केली आहे. घोडबंदर रोडवरील सरस्वती शाळेसमोरील आनंदनगरच्या क्रिश प्लाझा येथे सकाळी ११ वाजल्यापासून रात्रीपर्यंत ही भोजनाची व्यवस्था असेल.
जीएसटीमुळे टी शर्ट महागदरवर्षी मंडळांच्या टी शर्टच्या संख्येत वाढ होत असते. परंतु यंदा जीएसटीमुळे टी शर्टच्या किंमतीही वाढल्या आहेत आणि याचा अतिरिक्त भार गोविंदा पथकांवर येणार आहे. त्यामुळे टी शर्टचा खर्च भागवायचा कसा, असा प्रश्नही त्यांना सतावतो आहे.