ठाणे : संपत्तीच्या लालसेपोटी तसेच परपुरुषाशी लग्न करण्यासाठी आपला मुलगा विनायक लोंढे याचा त्याची पत्नी पूनम हिनेच खून केल्याचा आरोप त्याच्या ६५ वर्षीय आईने केला आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने कापूरबावडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला.ठाण्याच्या ‘एनजी रिजन्सी’ या इमारतीमध्ये १६ एप्रिल २०१७ रोजी विनायकने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंदही घेण्यात आली होती. दरम्यान, ही आत्महत्या नसून खून असल्याचा आरोप करून विनायक यांच्या आईने त्यांची सून पूनम (३४) हिच्यावर संशय व्यक्त केला. तिने संपत्ती हडप करण्याच्या इराद्याने तसेच परपुरुषाशी लग्न करण्यासाठी हा खून केल्याचाही आरोप ठाणे न्यायालयाकडे केलेल्या तक्रार अर्जामध्ये केला. न्यायालयानेही या अर्जाची गंभीर दखल घेऊन सीआरपीसी १५६ (३)नुसार याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश कापूरबावडी पोलिसांना दिले. त्यानुसार, पूनम हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, या प्रकरणी सखोल चौकशी सुरू आहे.
मुलाची आत्महत्या नव्हे, तर खूनच : आईचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 6:13 AM