अनिकेत घमंडी, डोंबिवलीकल्याण-डोंबिवलीतील ६६ महिलांनी रिक्षा चालवण्याकरिता इरादापत्र दिले होते. मात्र त्यापैकी केवळ एक महिला रिक्षा चालवत आहे. उर्वरित सर्वच महिलांचा रिक्षाच्या अबोली रंगाला आणि महिलेची रिक्षा पुरुषाला चालवायला न देण्याच्या धोरणाला सक्त विरोध असल्याने महिला सक्षमीकरणाची रिक्षा पंक्चर झाली आहे.राज्य शासनाच्या परिवहन विभागाने महिलांनी रिक्षा चालवून स्वत:च्या पायावर उभे रहावे याकरिता मोठा गाजावाजा करून ही योजना सुरु केली. मात्र ठाण्यापाठोपाठ कल्याण-डोंबिवलीत महिलांनीच ही योजना अपयशी ठरवली. इरादापत्र देणाऱ्या ६६ महिलांपैकी ६० जणींनी अद्याप रिक्षा खरेदी केलेली नाही. केवळ सहा महिलांनी रिक्षा खरेदी केल्या व त्यापैकी एक महिला डोंबिवलीत रिक्षा चालवण्याचा मार्ग निवडला. महिलांना रिक्षाचे मालक व्हायचे आहे. त्यांना चालक होण्यात फारसा रस नाही. त्यामुळे महिलेच्या नावावर खरेदी केलेली रिक्षा तिचा भाऊ अथवा पती चालवेल, असा त्यांचा आग्रह आहे. त्यामुळेच महिला रिक्षाला अबोली रंग नको रे बाबा, असा आग्रह धरत आहेत. आरटीओ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अबोली रंग महिलांच्या रिक्षाला दिला तर तो तत्काळ उठून दिसेल. ज्या महिला प्रवाशांना महिला चालकाच्या आॅटोमध्ये बसायचे असेल त्यांनाही ती लगेच ओळखता यावी, हा वेगळ््या रंगामागील उद्देश आहे. महिलांना रोजगाराची संधी मिळावी या उद्देशाने ही योजना आणली असल्याने रिक्षाला अबोली रंग आवश्यक आहे. रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्याने सांगितले की, महिलांच्या नावावर खरेदी केलेली रिक्षा पुरुष चालवणार हा अबोली रंगाच्या विरोधामागचा मुख्य हेतू आहे. इरादापत्रांचे वितरण होऊन तीन महिन्यांहून अधिक काळ उलटली तरीही रिक्षा रस्त्यावर धावणे तर दूरच राहिले पण पासिंगसाठी आरटीओतही गेलेल्या नाहीत. रोजगाराची उत्तम संधी असताना केवळ हट्टाने ती गमावणार का, हा प्रश्न आहे.
चालक नव्हे, मालक व्हायचंय मला!
By admin | Published: July 13, 2016 1:54 AM