ठाणे - पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्त झाले. खड्डेही भरले. मग ते पुन्हा का उखडले? पाऊस आला की रस्ते उखडले, हे खपवून घेतले जाणार नाही. यापुढे केवळ ठेकेदारांवरच नाहीतर रस्ते आणि रस्ते दुरुस्तीच्या कामांची गुणवत्ता तपासणा-या अधिका-यांवरही कारवाईचे आदेश ठाण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे रस्ते विकास महामंडळाचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी ठाण्यातील खड्डयांची पाहणी दौ-यात दिले.
ठाण्यातून जाणा:या मुंबई-नाशिक पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच सेवा रस्त्यांवरील खड्डयांमुळे शहरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून मोठ्याप्रमाणात वाहतूककोंडीला ठाणेकरांना सामोरे जावे लागत आहे. याचा फटका अन्न व नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनाही गुरुवारी बसला. अवघ्या १५ मिनिटांच्या अंतरांसाठी दोन ते अडीच तासांचा अवधी लागत असल्यामुळे पालकमंत्री शिंदे यांच्यावर महाविकास आघाडीमध्ये सोबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही टीकेची झोड उठवून आंदोलनाचा इशारा दिला. या सर्वच घटनांची गांभीर्याने दखल घेऊन शिंदे यांनी ठाण्यातील आनंदनगर चेकनाका येथून शुक्रवारी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास पाहणी दौरा केला. याच दौ:यावेळी ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, एसएसआरडीसी, एमएमआरडीए तसेच मेट्रोचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
महापालिकेसह सर्व यंत्रणांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवून कामे करतांना गुणवत्ता राखली पाहिजे. जर एखादा ठेकेदार निकृष्ट दर्जाचे काम करीत असेल तर त्याला काळ्या यादीत टाका. पैसे घेऊन कामे निकृष्ट होणार असतील तर खपवून घेतले जाणार नाही. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही. काळ सोकावता कामा नये. पावसाळ्यापूर्वी कामे होऊनही पावसानंतर रस्ते उखडले कसे? त्याची गुणवत्ता, डांबराचे प्रमाण, तापमान हे सर्वच चांगल्या प्रकारे तपासले गेले पाहिजे. यापुढे केवळ ठेकेदारांवरच नाहीतर अधिका:यांनाही जबाबदार धरून कारवाईचा इशारा पालकमंत्र्यांनी दिला. आनंदनगर येथे तब्बल पाऊणतास स्पॉटवरच अधिका:यांची शाळा घेतल्यानंतर शिंदे पुढे पाहणीसाठी भिवंडीकडे रवाना झाले.