अजित मांडकेठाणे : राज्य परिवहन महामंडळाने ५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केली आहे, परंतु आधीच पगार कमी, त्यात हक्काचे घर अद्याप नाही, मुलांच्या शिक्षणासाठी काढलेले कर्ज डोक्यावर आहे, पत्नी घरीच असते, असे एक ना, अनेक प्रश्न आमच्यासारख्या कर्मचाऱ्यांपुढे उभे ठाकले असल्याची माहिती एसटी कर्मचाऱ्यांनी दिली. स्वेच्छानिवृत्ती नको असतानाही जबरदस्ती केली जात आहे. त्यामुळे नोकरी गेली, तर घर कसे चालवायचे, असा पेच त्यांच्यापुढे ठाकला आहे.
जिल्ह्यात एसटी आठ डेपो आहेत. त्यामध्ये ५० वर्षे वय झालेले ७५० कर्मचारी, अधिकारी आहेत. या सर्वच कर्मचारी, अधिकाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती घेण्यासाठी जबरदस्ती केली जात आहे. एसटीचे पगार कमी, त्यात ते पगारही वेळेत होत नाहीत, भत्ते असून नसल्यासारखे आहेत. पगार दिसताना दिसतो, पण हातात येताना तो कापूनच येतो. त्यामुळे वयाच्या आठ वर्षे आधीच नोकरी सोडावी लागण्याचे दु:ख फार वाईट आहे. माझे वय ५० वर्षे पूर्ण झालेले आहे, मला स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज करण्यास सांगितले आहे. माझी इच्छा नाही, नोकरी सोडण्याचे कारण नाही. घरात मीच कमावता आहे, पत्नीचे वय झाले आहे. साधे हक्काचे घरही नाही, असे एका कर्मचाऱ्याने सांगितले.
स्वेच्छानिवृत्तीचा लाभ घेतल्यास काय मिळणार?स्वेच्छानिवृत्ती घेतली, तर हातात १५ ते २० लाखांच्या आसपास रक्कम पडणार आहे. ती कर्ज फेडण्यातच जाणार आहे. पुढील आयुष्य कसे जगायचे, आजारपण आले, तर त्यासाठी खर्च कुठून करायचा, मुलाचे शिक्षण झाल्यावर त्याचे लग्न कसे करायचे, असे अनेक प्रश्न आमच्यापुढे आहेत. जिल्ह्यातील ७५० कर्मचारी, अधिकाऱ्यांपुढे हा प्रश्न आहे. त्यामुळे शासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी विनंती आम्ही करतो, असे ठाणे विभागातील एसटी कर्मचाऱ्याने सांगितले.
हप्ते फेडायचा पेचभाड्याच्या घरात वास्तव्य असून, १० हजारांचे भाडे भरावे लागत आहे. माझा मुलगा एमबीएचे शिक्षण घेत आहे. त्यासाठी सुमारे ८ लाखांचे कर्ज काढले आहे. तसेच गावातील कामांसाठी काही कर्ज काढलेले आहे. त्या कर्जाचे हप्ते कसे फेडायचे? - एसटी कर्मचारी, ठाणे विभाग
घर कसे चालवायचे?घरात कमवते हे एकटेच आहेत, त्यामुळे घराचा सारा भार त्यांच्यावर आहे. स्वेच्छानिवृत्ती घेतली, तर मिळणाऱ्या पैशातून केवळ कर्जाचीच परतफेड होणार आहे, पण पुढे संसाराचा गाडा कसा हाकायचा, हा प्रश्न आहेच. - एसटी कर्मचाऱ्याची पत्नी