लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढण्यास विद्यमान आमदार निरंजन डावखरे इच्छुक असतानाच सिंधुदुर्गातील माजी खासदार नीलेश राणे यांनी ही निवडणूक लढवण्याकरिता घरोघरी जाऊन सदस्य नोंदणी सुरू केल्याने भाजप अंतर्गत चुरस निर्माण झाली. डावखरे व राणे हे दोघेही अन्य पक्षांतून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे आता भाजप डावखरे यांना पुन्हा संधी देणार की, केंद्रात मंत्री असलेल्या नारायण राणे यांच्या शब्दाखातर त्यांच्या पुत्राला संधी देणार, याची चर्चा सुरू झाली.
२०१८ मध्ये झालेल्या भाजप विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी असा सामना झाला होता; परंतु आताचे चित्र बदलले आहे. राज्यात शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि भाजप सत्तेत आहेत; परंतु ठाणे आणि कल्याण लोकसभेवरून शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. कोकण पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने त्यात आणखी भर पडली आहे. भाजपमध्ये डावखरे व राणे हे दोन इच्छुक आहेत.
काँग्रेसचा दिला स्वबळाचा नारा शिवसेनेने देखील मतदार नोंदणी मोहीम सुरू केली आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाने ठाणे ते सिंधुदुर्ग पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. त्यात आता काँग्रेसने उडी घेतली आहे. काँग्रेसने यापूर्वीच स्वबळाचा नारा दिला आहे. आता कोकण पदवीधर लढण्याची तयारी दर्शविली आहे. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक आता चुरशीही होऊ लागली आहे.