ठाणे : लाडक्या बाप्पाच्या आगमनावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून खबरदारीचे सर्व उपाय योजून तब्बल चार हजाराहून अधिक पोलिसांचा फौजफाटा सुरक्षेसाठी तैनात केला आहे. तर २०० पेक्षा अधिक उपद्रवी व्यक्तींना नोटिसा बजावल्या आहेत.
बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी सकाळपासून सायंकाळपर्यंत गणेश मंडळांना मूर्ती स्थापनेची परवानगी देण्यात आली आहे. यावेळी मिरवणूक काढू नये व तीनपेक्षा जास्त व्यक्तींनी मूर्ती स्थापना व विसर्जनस्थळी एकत्र येऊ नये, असे नियम पोलिसांनी घालून दिले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप परिसरात सीसीटीव्ही लावणे बंधनकारक केले आहे. तसेच मंडपात निर्जंतुकीकरण, सॅनिटायझर, थर्मल स्क्रीनिंग व इतर पर्याप्त व्यवस्था करावी, भाविकांना ऑनलाईन, केबलच्या माध्यमातून दर्शन व्यवस्था करावी, अन्नप्रसाद, महाप्रसाद असे गर्दी करणारे कार्यक्रम घेऊ नये, मनोरंजन कार्यक्रम घेण्यापेक्षा रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर असे कार्यक्रम आयोजित करावेत, असे निर्देशदेखील पोलिसांनी गणेशोत्सव मंडळांना दिले आहेत.
दरम्यान, शहरातील गर्दीवर नजर ठेवण्यासाठी मुख्य मार्गावरील मोक्याच्या ठिकाणी मनोरे उभारले आहेत. तसेच मुख्य मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी काही इमारतींची छते प्रशासनाने ताब्यात घेतली आहेत. वाहतूक पोलिसांनीदेखील ठिकठिकाणी तपासणी नाके उभारले असून, वाहनांची तपासणी करूनच त्यांना शहरात प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. दरम्यान, ठाणे पोलिसांनी गणेशोत्सव काळात सुरक्षा व्यवस्था चोख राहावी यासाठी आयुक्तालयातील पोलिसांच्या व पोलीस स्थानकातील मनुष्यबळाव्यतिरिक्त इतर ठिकाणांहून अतिरिक्त फौजफाटा मागवला आहे तसेच २०० पेक्षा अधिक उपद्रवींना नोटिसा बजावल्या आहेत. गणेश मंडळांनीदेखील सुरक्षा व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.