कल्याण : मालमत्ता विवरणपत्र सादर न केल्याप्रकरणी केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना आयुक्त ई. रवींद्रन यांनी नोटीस बजावली आहे. सरकारनिर्णयानुसार विवरणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, ती सादर न केल्याप्रकरणी खुलासा करा, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. २ जून २०१४ च्या सरकार निर्णयानुसार वर्ग-४ वगळता सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना दरवर्षी मालमत्ता विवरणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. असे असताना २००९-१०, २०१३-१४, २०१४-१५ व २०१५-१६ या वर्षांचे मालमत्ता व दायित्वाची विवरणपत्रे सादर केलेली नाहीत. ही बाब कार्यालयीन शिस्तीचा भंग करणारी आहे. विवरणपत्रे मुदतीत सादर करा, असे घरत यांना दिलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे. यासंदर्भात घरत यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. दरम्यान, घरत यांच्यासह अन्य काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही अशा प्रकारच्या नोटिसा बजावल्याची माहिती मिळत आहे. (प्रतिनिधी)
अतिरिक्त आयुक्तांना नोटीस
By admin | Published: October 01, 2016 3:04 AM