ठाणे : मुंब्य्रातील प्राईम क्रिटिकेअर हॉस्पिटलला लागलेल्या आगीनंतर जाग आलेल्या ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील ३४७ रुग्णांलयांना पुन्हा नोटिसा बजावून अग्निसुरक्षा सक्षम करण्यास सांगितले आहे. या रुग्णालयांपैकी ३४ रुग्णालये बंद असून २८२ रुग्णालयांना हा अहवाल आता सादर करावा लागणार आहे.
यापूर्वी ६५ रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणाच नसल्याचे यापूर्वीच उघड झाले आहे. त्यामुळे त्यांनादेखील पुढील सात दिवसांची मुदत दिल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे. त्यानंतर कशाप्रकारे कारवाई करता येऊ शकते, याचा अभ्यासदेखील अग्निशमन विभागाने सुरू केला आहे.
एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंब्य्रातील प्राईम क्रिटिकेअर हॉस्पिटलला आग लागली होती. या आगीतून बाहेर काढल्यानंतर चार रुग्णांचा मृत्यू झाला होता. तपासणीअंती या रुग्णालयाकडे फायर एनओसीच नसल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाने आता शहरातील सर्वच रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे निश्चित केले आहे. शहरात सरकारी तसेच पालिका रुग्णालये व आरोग्य केंद्रांची संख्या ३४ च्या आसपास असून ३४७ खासगी रुग्णालये आहेत.
मुंब्रा घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी शहरातील शासकीय तसेच खासगी रुग्णालयांची अग्निसुरक्षा यंत्रणा तपासणीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता हे काम पुन्हा एकदा सुरू झाले आहे. त्यामध्ये २८२ रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा असल्याचे समोर आले होते. ३४ खासगी रुग्णालये बंद असून ६५ रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणाच नसल्याची बाबही पुढे आली होती. या ६५ रुग्णालयांना नोटिसा बजावून सात दिवसांत अग्निसुरक्षा यंत्रणा बसविण्याचे आदेश अग्निशमन दलाने दिले होते. मात्र, त्याकडे या रुग्णालयांनी अद्यापही दुर्लक्ष केले आहे. मुदतीनंतरही यंत्रणा बसविण्याकडे कानाडोळा करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या रुग्णालयांवर काय कारवाई करता येऊ शकते, याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले.