मीरा रोड : मीरा रोडच्या शांतीनगरमधील एका गृहनिर्माण संस्थेला मंजूर दोन नळजोडण्यांचे पाणीच मिळालेले नसताना महापालिकेने १२ हजार ३९१ रुपयांचे देयक पाठवतानाच ते न भरल्यास नळजोडण्या खंडित करण्याची नोटिस बजावल्याचा प्रकार घडला आहे. पालिकेच्या या भोंगळपणाचा रहिवाशांना धक्का बसला आहे.
शांतीनगर सेक्टर ८ मधील अंबिका शांतीनगर सोसायटी असून त्यांनी दोन नवीन नळजोडण्यांसाठी २ नोव्हेंबर २०१८ रोजी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे अर्ज केला होता. फेबु्रवारी २०१९ मध्ये एक इंच व्यासाच्या दोन नळजोडण्या मंजूर झाल्याने त्याचे शुल्क रहिवाशांनी पालिकेला अदा केले. त्या अनुषंगाने २ मार्चला पाणीपुरवठा विभागाने दोन नळजोडण्या जोडण्याचे कार्यादेश विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे यांनी मेस्त्री पथक ४ ला दिले. त्याची प्रत सोसायटीसह पाणीपुरवठा विभागास देण्यात आली.
दरम्यानच्या काळात लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणुक आचारसंहिता आदी कारणांनी ११ डिसेंबरला पाणीपुरवठा विभागाने मुख्य जलवाहिनीवरून दोन नळजोडण्या सोसायटीच्या आतील आवारात आणून ठेवल्या. या जोडण्या अजून पाण्याच्या टाकीत जोडणी करणे बाकी आहे. तसे असताना या सोसायटीला दोन नळजोडण्यांच्या पाण्याचे मे ते आॅगस्ट असे चार महिन्यांचे देयक पाठवले. एका नळजोडणीचे ४,४८२ व दुसऱ्या नळजोडणीचे ७,९०९ रुपये देयक भरण्यास सांगितले.
हे देयक ४८ तासांत न भरल्यास दोन्ही नळ जोडण्या खंडित केल्या जातील अशी नोटिस कार्यकारी अभियंत्यांच्या सहीने बजावण्यात आली आहे. नळजोडण्या खंडित केल्या नंतर पुन्हा जोडण्यासाठी वेगळा खर्च वसुल केला जाईल अशी तंबीही दिली गेली. रहिवाशांनी याचा जाब पालिका कर्मचाºयास विचारला असता चुकून झाले. देयक आणि नोटीस परत द्या अशी मागणी करण्यात आली.
महापालिकेच्या या भोंगळ कारभाराचा या गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी राकेश विश्वकर्मा यांनी निषेध व्यक्त केला आहे. पाण्याचा एक थेंब अजून रहिवाशांना मिळाला नाही आणि पाण्याचे देयक व त्यापाठोपाठ नळजोडणी तोडण्याची नोटिस बजावण्याचा प्रकार संतापजनक असल्याचे विश्वकर्मा म्हणाले. नगरसेवकांना केवळ आपलं उखळ पांढरे करण्यात स्वारस्य असल्याने पालिका प्रशासनाच्या कामकाजावर त्यांनी डोळेझाक चालवल्याचा आरोप त्यांनी केला.