कल्याण : डोंबिवलीएमआयडीसी परिसरातील रासायनिक सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या फुटलेल्या आहेत. त्यामुळे सांडपाणी केंद्रापर्यंत रसायनमिश्रित पाणी न पोहोचता इतरत्र वाहत आहे. या वाहिन्यांची दुरुस्ती करणे, हे एमआयडीसीचे काम आहे. मात्र, त्याची पूर्तता होत नसल्याने एमआयडीसीला प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस पाठवली आहे. तीन दिवसांत या वाहिन्यांची दुरुस्ती न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा या नोटीसद्वारे देण्यात आला आहे आहे.
रासायनिक कारखान्यांतून बाहेर पडणाºया सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया केली जात नाही, असा आरोप ‘वनशक्ती’ या पर्यावरण संस्थेने केला आहे. या संस्थेच्या वतीने ‘सेव्ह उल्हास रिव्हर’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे २०१३ रोजी याचिका दाखल केली आहे. त्याचबरोबर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही आहे.
पावसाळ्यात हे सांडपाणी पावसाच्या पाण्यात मिसळून थेट कल्याण खाडीत मिसळत होते. २० जून २०१८ रोजी प्रदूषण नियंत्रण मंडळाने एमआयडीसीला याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यांच्याकडून या नोटीसची दखल घेतली गेली नाही. त्यानंतर, मंडळाने ५ डिसेंबर २०१८ रोजी एमआयडीसीला मागदर्शक तत्त्वे काय आहेत, याची जाणीव करून देणारी आणखीन एक नोटीस पाठवून फुटलेल्या सांडपाणी वाहिन्यांची दुरुस्ती करण्याचे बजावले होते. या नोटीसचीही दखल घेतली नाही. त्यानंतर, वनशक्तीचे अश्वीन अघोर यांनी २४ एप्रिलला ही बाब प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळवली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी २६ एप्रिलला पाहणी केली. त्यानंतर प्रादेशिक अधिकारी धनंजय पाटील यांनी एमआयडीसीला नोटीस बजावली असून तीन दिवसांत दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत.
सोनारपाड्यात रासायनिक पाण्याचे डबकेडोंबिवली एमआयडीसी फेज-१ आणि फेज-२ मध्ये असलेल्या कारखान्यांतून रासायनिक सांडपाणी वाहून नेणाºया वाहिन्या ठिकठिकाणी फुटल्या आहेत. त्यामुळे रासायनिक सांडपाणी इतरत्र वाहत आहे. सोनारपाडा व आजदे गावात हे प्रकार जास्त घडत आहेत. काही ठिकाणी रासायनिक सांडपाण्यामुळे झाडांना नुकसान झाले आहे. काही झाडे करपून गेली आहेत. सोनारपाड्यात रासायनिक सांडपाण्याचे डबके तयार झाले आहे.