बोईसर : तारापूर एमआयडीसीमध्ये शनिवारी भीषण स्फोट झालेल्या अँक फार्मासह एकूण सहा उद्योगांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंदची कारवाई केली आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या संमतीपत्राच्या अटी, शर्ती व चौकटीनुसार उत्पादन न घेणे तसेच पर्यावरणाच्या नियमांना बगल देणे इत्यादी विविध दोषारोप ठेवले. त्याआधारे कारवाई करण्यात आली.दरम्यान, विकास इंडस्ट्रीज अॅण्ड केमिकल्समधील स्टोरेज टँकमध्ये मिक्चर आॅफ नायट्रिकम व सल्फ्युरिक अॅसिड होते. त्या टँकचा वॉल नादुरुस्त होऊन त्यातून विषारी वायूची गळती मोठ्या प्रमाणात सांडपाण्याच्या नाल्यात होत होती. चेंबरमधूनही पिवळ्या रंगाचा विषारी वायू बाहेर येत होता.
उद्योगमंत्री सुभाष देसाई तसेच जिल्हाधिकारी, खासदार, आमदार यांनाही हे दृश्य अॅँक फार्मा कंपनीत भेट देण्यासाठी आले तेव्हा पाहायला मिळाले होते.‘या’ कंपन्यांचा समावेशतारापूर एमआयडीसीतील अँक फार्मासह, विकास इंडस्ट्रीज् अॅण्ड केमिकल्स, कॅम्लीन फाईन सायन्स रिसॉनन्स स्पेशॅलिटी, डी.एच. आॅरगॅनिक, एन.जी.एल. फाईन केम या सहा कारखान्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘बंद’ची नोटीस बजावली आहे. तसेच या कारखान्यांचे पाणी व वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत.