ठाणे : सत्ताधाऱ्यांनी रस्त्यांवर उतरून खड्डे बुजवण्याचे आदेश दिल्यानंतर आता खडबडून जागे झालेल्या आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सोमवारी याबाबत तातडीची बैठक घेऊन ते तत्काळ बुजवण्याचे आदेश दिले. यासाठी रस्ते कोणाच्या मालकीचे आहेत, हे पाहू नका, असेही त्यांनी सांगितले आहे. तसेच रस्तेबांधणीच्या हमीचा कालावधी तपासून संबंधित ठेकेदारांना नोटिसा देण्याच्या सूचनादेखील त्यांनी दिल्या.मागील काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने ठाणेकरांची दैना उडवली आहे. त्यात शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खडड््यांमुळे महापालिकेच्या अब्रूचे धिंडवडे निघाले आहेत. खड्ड्यांचे प्रमाण कमी असल्याचा प्रशासनाचा दावाही फोल ठरला आहे. काही दिवसांपूर्वी मनसेने खड्ड्यांत झोपून अनोखे आंदोलन केल्यानंतर सत्ताधारी शिवसेनेलादेखील खरेच खड्डे पडले आहेत, याची जाणीव झाली. त्यामुळेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर मीनाक्षी शिंदे यांनी रस्त्यांची पाहणी करून तत्काळ खड्डे बुजवण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले. त्यानंतर, उशिराने का होईना जागे झालेल्या महापालिकेलासुद्धा शहरातील खड्डे दिसले आहेत. या खड्ड्यांमुळे जीवघेणा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच त्यांच्या मुद्यावरून प्रशासनावर टीकेचा भडीमार होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सोमवारी विभागप्रमुखांची बैठक घेऊन त्यात शहरातील खड्डे तत्काळ बुजवण्याचे आदेश दिले.महापालिका क्षेत्रातील रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए आणि रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत आहेत. त्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या.>वस्तुस्थिती अहवाल सादर कराभरपावसात सिमेंट किंवा डांबराचा वापर करून खड्डा भरणे शक्य नसले, तरी पर्याय म्हणून पेव्हरब्लॉकने ते भरण्यास सुरुवात करावी. तसेच सर्व अभियंत्यांनी आपापल्या प्रभागात फिरून त्यांची स्थिती तपासून बांधकाम साहित्य वापरून किंवा पेव्हरब्लॉक वापरून ते भरावेत, असे आदेश त्यांनी दिले आहेत. याशिवाय, त्यांचा वस्तुस्थिती अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी बांधकाम विभागाला केल्या आहेत.पावसाळ्याच्या कालावधीत आरोग्य, घनकचरा, पाणीपुरवठा आणि बांधकाम विभागासह सर्व यंत्रणांनी रस्त्यावर उतरून कामे करावीत. साफसफाई, वृक्ष प्राधिकरण, फवारणीची सर्व कामे युद्धपातळीवर करण्याचे आदेशही त्यांनी दिले. याशिवाय, रस्तेबांधणीचा कालावधी लक्षात घेऊन त्या रस्त्यांना जर खड्डे पडले असतील, तर संबंधित ठेकेदारांना नोटिसा बजावण्यासही सांगितले.
रस्तेबांधणीचा कालावधी तपासून ठेकेदारांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 2:54 AM