मुंब्रा : शाहूनगर, शिरिन अपार्टमेंट (सी आणि डी विंग), तृप्ती अपार्टमेंट (बी आणि सी विंग), प्रकाश कॉम्प्लेक्स (ए, बी, सी आणि डी विंग), मिलन अपार्टमेंट (ए आणि बी विंग), राॅयल अपार्टमेंट, अक्सा अपार्टमेंट, एल बिल्डिंग (ए, बी आणि सी विंग), गुरूनाथ चाळ, सत्यम, गीतांजली आणि सुधिक्षा अपार्टमेंट आदी २० इमारतींमध्ये राहत असलेल्या शेकडो कुटुंबांना आपल्या निवासाचे दस्तऐवज सादर करण्याच्या नोटीस रेल्वेकडून देण्यात आल्या आहेत.
या इमारतींमध्ये राहत असलेली शेकडो कुटुंबे मागील काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली वावरत आहेत. त्यांना आलेल्या नोटीसवर विचारविनिमय करण्यासाठी मंगळवारी रात्री बॉम्बे कॉलनी येथे बैठक झाली. दरम्यान, नोटीस आलेल्यांपैकी कुठलीही इमारत तोडून देणार नाही तसेच कुणालाही बेघर होऊ देणार नसल्याचे आश्वासन माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिले. ही लढाई तुमच्याबरोबरच माझीही असल्याचे ते यावेळी म्हणाले.
ज्यांना नोटीस आल्या आहेत, त्यांनी त्यांच्याजवळील कागदपत्रे ब्लाॅक अध्यक्ष बबलू शेमना यांच्या कार्यालयात जमा करण्यास सांगितले. दरम्यान, नोटिसीमुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस सय्यद अली अशरफ, ब्लाॅक अध्यक्ष मोहम्मद गौस उर्फ बबलू शेमना, ठामपाच्या वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य संगीता पालेकर आदी उपस्थित होते.