ठाणे : धर्मवीरनगर येथील बीएसयूपी योजनेतील घरांचा हा भोंगळ कारभार गुरुवारी मनसेने चव्हाट्यावर आणला होता. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने अनधिकृतरीत्या राहणाऱ्या रहिवाशांच्या नावे नोटिसा काढून सात दिवसात सदनिका मोकळी करून देण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे या घुसखोर या रहिवाशांचे धाबे दणाणले आहे.
सदनिका तात्काळ खाली करा, अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करीत सामान जप्त करण्याची तंबी प्रशासनाने या रहिवाशांना दिली आहे. धर्मवीरनगर येथील तुळशीधाम परिसरातील बीएसयूपी योजनेतील घरे आणि वादाची मालिका थांबतच नसून, येथील आनंदकृपा सोसायटी इमारत क्रमांक २३ मध्ये ६०३, ८०२, ८०४, ८०५ व ८०७ या सदनिकांचा काही रहिवाशांनी अनधिकृतरीत्या ताबा घेतला असल्याचे बोलले जात आहे. याविषयीची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्याकडे आली होती. त्यानंतर त्यांनी रहिवाशांच्या शिष्टमंडळासह पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांची भेट घेऊन हा प्रकार उघडकीस आणला. यामुळे महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांनी बेकायदा पद्धतीने राहणाऱ्या रहिवाशांना नोटिसा धाडल्या आहेत. अनधिकृतपणे कोणत्याही प्रकारची विचारणा न करता सदनिकेत ठेवलेले सामान बाहेर काढावे. सात दिवसात सदनिका मोकळी करून द्यावी. अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. एवढेच नव्हे तर सामान जप्त केले जाईल, असेही या नोटिशीत नमूद केले आहे.
----------