कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविले जात नसल्याने मनसेच्या वतीने १ ऑक्टोबर रोजी महापालिकेच्या वर्धापन दिनी खड्डय़ात केक कापून अनोखे आंदोलन केले होते. या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतली आहे. काल रात्रीपासून डोंबिवलीतील रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात केली आहे.
मनसेने कारवा रुग्णालय ते टिळक पुतळ्य़ा दरम्यान रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ात केक कापून प्रशासनाचे रस्त्यावरील खड्डे प्रकरणी लक्ष वेधले होते. या आंदोलाची प्रशासनाने आठ दिवसांनी दखल घेतली आहे. काल रात्रीपासून खड्डे बुजविण्याचे काम सुरु केले आहे. या कामाची पाहणी मनसेचे शराध्यक्ष राजेश पाटील यांनी रात्रीच केली. रेल्वे प्रवासी वाहतूक सामान्य प्रवासांकरीता सुरु झालेली नाही. त्यामुळे सगळा वाहतूकीचा ताण हा रस्ते वाहतूकीवर आहे. शहरातील रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. त्याचबरोबर कल्याण शीळ रस्त्यावरही खड्डे पडले होते. या रस्त्यावरील खड्डे प्रकरणी दोन महिन्यापूर्वी मनसे आमदार राजू पाटील व खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात आरोप प्रत्यारोपाचे राजकारण रंगले होते. त्यावेळीही आमदार पाटील यांनी खासदार शिंदे यांच्या डोंबिवलीतील निवासस्थानासमोरील खड्डे दाखविले होते. त्यावेळीही रातोरात्र त्याठिकाणी खड्डे बुजविले गेले होते. त्यानंतर मनसेने पुन्हा रस्त्यावरील खड्डे प्रकरणी आंदोलन केले होते. शहरातील खड्डे बुजविण्याच्या कामावर १५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. कंत्राटदारांना अद्याप बिले दिलेली नाही. मात्र पावसाने उसंत दिली नसल्याने केवळ खडीने खड्डे बुजविले गेले.
ऑक्टोबरनंतर खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले जाईल असे दोनच दिवसापूर्वी महापालिकेच्या शहर अभियंत्या सपना कोळी देवनपल्ली यांनी स्पष्ट केले होते. हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप केला होता. लोकप्रतिनिधींकडून केला जात असताना कामाची बिलेच दिली गेली नाही तर भ्रष्टाचार या आरोपात तथ्य नाही असा प्रशासनाकडून खुलासा करण्यात आला होता. मनसेने आंदोलन ज्या ठिकाणी केले त्याच रस्त्यावरील खड्डे बुजविले जात असले तरी संपूर्ण शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविले गेले पाहिजेत अशी मागणी मनसे शहराध्यक्ष कदम यांनी केली आहे.