- सदानंद नाईक
उल्हासनगर : थांगपत्ता लागत नसलेल्या २६ कामगारांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी महापालिका प्रशासनावर वृत्तपत्रातून नोटिसा काढण्याची वेळ आली. सदर कामगार हजर झाल्यानंतर त्यांच्याकडून खुलासा व माहिती घेऊन कामावर हजर करून घेण्याचे संकेत उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिले.
उल्हासनगर महापालिकेत वर्ग-१ व २ चे ८० टक्के तर वर्ग-३ व ४ ची ४० टक्के पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. रिक्त पदे असल्याने कामाचा ताण वाढत असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने वेळोवेळी दिली. सतत गैहजर राहत असलेल्या ४७ कामगारांचा प्रश्न एका वर्षांपूर्वी ऐरणीवर आल्यानंतर तत्कालीन उपायुक्त संतोष देहरकर यांनी कामगारांना नोटीस पाठवून खुलासा मागितला होता. त्यापैकी काही कामगारांनी खुलासा व माहिती दिल्यावर त्यांना तसेच काहींच्या वारसाहक्काना नियमानुसार महापालिका सेवेत रुजू करून घेतले. यामध्ये कामगार संघटनेने महत्वाची भूमिका वठविली. मात्र राहिलेल्या २६ कामगारांचा प्रश्न अद्याप तसाच टांगता राहिल्याची माहिती कामगार संघटनेचे अध्यक्ष राधाकृष्ण साठे यांनी दिली. त्या कामगारांचे खुलासे घेऊन त्यांना कामावर घेण्याची मागणी केली.
महापालिका उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी विभागा मार्फत सतत राहत असलेल्या २६ कामगारांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तसेच दिलेल्या पत्त्यावर पत्र पाठवून खुलासा मागितला. मात्र त्यांच्याकडून काहीएक उत्तर आले नाही. त्यांनी दिलेल्या पत्त्यावर ते राहत नसल्याचे उघड झाले. अखेर त्यांना महापालिका सेवेतून कमी का करू नये? अशी भूमिका प्रशासनाने घेतली. त्यांच्या नोकऱ्या शाबूत राहण्यासाठी वृत्तपत्रातून त्यांना खुलासा मागविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती उपायुक्त नाईकवाडे यांनी दिली. त्यांचे खुलासे व माहिती दिल्यावर त्यांना नियमानुसार महापालिका सेवेत घेण्याचे संकेत त्यांनी दिले. थांगपत्ता लागत नसलेले कामगार गेले कुठे? असी चर्चा महापालिका क्षेत्रासह शहरात रंगली आहे.
२६ कामगार कामावर हजर होतील- साठे
सतत गैहजर राहत असलेल्या तब्बल २६ कामगारांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रशासनाने वृत्तपत्रातून खुलासा मागितला आहे. कामगार संघटनेच्या यातील बहुतांश कामगार संपर्कात असून त्यांना महापालिका सेवेत घेण्यासाठी संघटना प्रयत्नशिल असल्याची माहिती कामगार संघटनेचे अध्यक्ष राधाकृष्ण साठे यांनी दिला.