ठाणे - वाहतुकीचे नियम पायदळी तुडविल्यानंतर वाहन चालक ठाणे शहर वाहतूक शाखेने आकारलेल्या दंडाची रक्कम वर्षानुवर्षे भरणे टाळतात. अशाच एक लाख १६ हजार चालकांना ठाणे शहर वाहतूक शाखेने नोटीस बजावली आहे. त्यातील तडजोड शुल्क २३ सप्टेंबरपर्यंत भरा, अन्यथा २५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीत हजर राहावे, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.
या नोटीसकडे कानाडोळा करणारे पुन्हा वाहतूक पोलिसांच्या कारवाईत आढळल्यास वाहन जप्त करून त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. त्यामुळे दंडाबरोबर पुढील कारवाईलाही सामोरे जावे लागणार आहे. नवी दिल्ली राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे ठाणे जिह्यातील सर्व न्यायालयांत २५ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने जिल्हा व तालुका न्यायालयीन क्षेत्रातील न्यायालयातील प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे लोकअदालतीमध्ये ठेवण्यात येणार आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करून कारवाई केलेल्या नागरिकांकडून वर्षानुवर्षे दंड भरलेला नाही, अशा वाहन चालकांना नोटीस बजावली आहे. त्यांना २३ सप्टेंबरपर्यंत जवळच्या वाहतूक उपविभागात तडजोड रक्कम भरण्याबाबत सूचना केल्या आहेत. ज्या नागरिकांना तडजोड शुल्क मान्य नसेल, त्यांनी २५ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालत ठाणे न्यायालयात हजर राहावे, असे आवाहन ठाणे शहर वाहतूक विभागामार्फत करण्यात आले आहे.वाहतूक नियमांचे उल्लंघन करून दंड भरण्यास टाळाटाळ करतील आणि पुन्हा वाहतूक पोलिसांच्या कारवाईदरम्यान आढळून येतील, अशांवर दंडात्मक कारवाईसह कायदेशीर कारवाईही होईल.
- श्रीकृष्ण कोकाटे, उपायुक्त, वाहतूक शाखा, ठाणे शहर