कल्याण : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फूल मार्केटमधील शेड धोकादायक झाल्याने त्या तोडण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने शेडधारकांना नोटिसा पाठवल्या आहेत. फूल मार्केट शेडचा विषय न्यायप्रविष्ट असताना महापालिकेने या नोटिसा बजावल्याने फूलविक्रेत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
दोन महिन्यांपूर्वी फूल मार्केटमधील ६५ शेड तोडण्याची कारवाई करण्यात आली होती. तेव्हा या कारवाईमागचे कारणच न दिल्याने हा विषय गाजला होता. याप्रकरणी पुन्हा उर्वरित शेड तोडण्यासाठी महापालिकेच्या ‘क’ प्रभाग अधिकाऱ्याने शेडधारकाना नोटिसा बजावल्या आहेत. फूल मार्केटमधील शेड या धोकादायक झाल्या आहेत. याचा स्ट्रक्चरल आॅडिट रिपोर्ट महापालिकेने तयार केला आहे. त्यानुसार त्या शेडवर कारवाई करणे आवश्यक असल्याचे या नोटिसांमध्ये म्हटले आहे.
१० फेब्रुवारीच्या तारखेच्या या नोटिसा १५ तारखेला विक्रेत्यांच्या हाती पडल्या. याकडे फूलविक्रेता असोसिएशनचे पदाधिकारी बजरंग हुलावले आणि भरत मेमाणे यांनी लक्ष वेधले आहे. बाजार समितीने ही फूल मार्केटची जागा महापालिकेला दिली आहे. या जागेचा सातबारा महापालिकेच्या नावावर नाही. फूल मार्केटच्या जागी नवी इमारत बांधण्यासाठी महापालिकेने परवानगी दिली. त्याची मुदत संपली असून आयुक्तांनी नव्या इमारतीच्या बांधकामास दिलेल्या परवानगीला स्थगिती आदेश दिला. याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने आयुक्तांचा स्थगिती आदेश उठवला. बांधकाम करण्यास परवानगी दिली, असे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले. न्यायालयाच्या आदेशात असे कुठेही काही स्पष्ट म्हटलेले नाही, असा दावा फूलविक्रेत्यांनी केला आहे. याप्रकरणी व्यापारी वर्गाने कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात दाद मागितली होती. त्यानुसार कल्याण न्यायालयाने ९ मार्चपर्यंत स्थगिती आदेश दिला होता.न्यायालयाचा स्थगिती आदेश असताना महापालिका शेड धोकादायक असल्याच्या नोटिसा कशाच्या आधारे बजावत आहे, असा प्रश्न हुलावले आणि मेमाणे या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. नवे आयुक्त विजय सूर्यवंशी यांची फूलविक्रेता असोसिएशनचे हुलावले यांनी भेट घेतली. या विषयावर दोन दिवसांत बैठक बोलावण्याचे आश्वासन आयुक्तांनी हुलावले यांना दिले.केडीएमसीला भाड्यापोटी २६ लाख येणेच्बाजार समितीच्या जागेत बाजार समितीचे १९६ व्यापारी हे भाडेकरू आहेत, तर महापालिकेचे २१० भाडेकरू आहेत. तसेच भाजीविक्रेत्यांसाठी ३३२ शेड आहेत.च्बाजार समितीकडून महापालिकेस भाड्यापोटी २६ लाख रुपये येणे बाकी आहे. याप्रकरणी येत्या महासभेत आवाज उठवला जाणार असल्याचे शिवसेना सदस्य सचिन बासरे यांनी सांगितले.