मीरारोड - अतिवृष्टीच्या इशाऱ्या नंतर शाळा बंद ठेवण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी यांनी देऊन सुद्धा शाळा सुरु ठेवणाऱ्या मीरारोड व भाईंदर येथील २ खाजगी शाळांना महापालिकेने नोटीस बजावून खुलासा मागवला आहे.
हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी १४ व १५ जुलै रोजी जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश जारी केले होते. परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत मीरारोड मधील आर बी के ग्लोबल शाळा आणि भाईंदर पश्चिम येथील डॉन बॉस्को शाळा ह्या सुरूच होत्या. अतिवृष्टी मुळे विद्यार्थ्यांचे हाल होऊ नये व कोणतीही जीवितहानी होऊ नये म्हणून खबरदारीचे उपाय डोळ्यासमोर ठेवत शाळा बंदचा निर्णय असताना सदर दोन शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी खेळ केल्याची टीका होत होती.
आता ह्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून शाळा भरवल्या प्रकरणी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याने ह्या दोन शाळांना नोटीस बजावून खुलासा मागवला असल्याचे उपायुक्त अजित मुठे यांनी सांगितले.