ठाणे : मुंबईसह ठाणे शहर परिसरात महिलांचे मंगळसूत्र तसेच सोनसाखळी खेचून दुचाकीवरुन पलायन करणा-या यदुल्ला उर्फ अब्दुल्ला जाफरी (२६) या ‘टॉप २०’ मधील कुख्यात गुंडासह महंमदअली नादरअली जाफरी (१९) या इराणी टोळीतील दोघांना नौपाडा पोलिसांनी रविवारी अटक केली. त्यांनी तीन सोनसाखळी चोरीच्या गुन्हयांची कबूली दिली आहे.भिवंडीच्या शांतीनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील इराणी पाडयातून त्यांच्यासह तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, संजय धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक हणमंत ओऊळकर आणि प्रशांत आवारे तसेच २० ते २५ जणांच्या पथकाने १९ डिसेंबर रोजी ताब्यात घेतले होते. पोलीस व्हॅनसह तीन छोटया खासगी टेम्पोतून पोलिसांनी इराणी पाडयात शिरकाव करुन ही कारवाई केली होती. दरम्यानच्या काळात त्यांनी तपासात विशेष कोणतीच माहिती न दिल्याने तसेच इराणी पाडयातील काही जेष्ठ नागरिकांच्या मध्यस्थीने पोलिसांनी त्यांची सुटकाही केली होती. त्यानंतर त्यांची पोलीस ठाण्यात दररोज हजेरी मात्र ठेवण्यात आली होती. दोन तीन दिवस चौकशीनंतर मध्येच त्यांनी आपला संपर्क तोडला होता. पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. याच चौकशीत तथ्यता आढल्यानंतर त्यांना २४ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना २७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. त्यांनी मुंबई, ठाण्याच्या परिसरात दुचाकीवरुन येऊन अनेक महिलांची मंगळसूत्रे हिसकावल्याची माहिती तपासात निष्पन्न होत असल्याचे नौपाडा पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यांच्याकडून काही सोन्याचे दागिनेही हस्तगत करण्यात आले आहेत. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे हे अधिक तपास करीत आहेत.