लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : बोलण्यात गुंतवून वयोवृद्ध महिला तसेच पुरुषांची फसवणूक करणाºया अनिल शेट्टी (३५, रा. मुंबई) या ठकसेनाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट १ च्या पथकाने मंगळवारी अटक केली. मुंबई, ठाण्यासह अनेक भागांत त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने अनेकांची फसवणूक करून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने लुबाडल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाण्यातील नौपाडा, ठाणेनगर, कल्याण आणि मुंब्रा आदी परिसरांत वयोवृद्ध लोकांना गाठून त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडील ऐवज लुबाडण्याच्या प्रकारांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये वाढ झाली आहे. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी अशा ठकसेनांना पकडण्याचे आदेश दिल्यानंतर या टोळीतील अन्वर शेख (३५, रा. कुरेशीनगर, कुर्ला, मुंबई) याला १९ सप्टेंबर रोजी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून सुमारे १३ तोळे तीन ग्रॅम वजनाचे तीन लाख ११ हजारांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. त्याआधी २२ आॅगस्ट रोजी राजू शेट्टी यालाही पोलीस हवालदार सुनील जाधव यांनी संकलित केलेल्या माहितीच्या आधारे पकडण्यात आले. राजू आणि अन्वर यांनी दिलेल्या माहितीच्या आधारेच त्याचा चुलत भाऊ अनिल शेट्टी यालाही आता अटक केली आहे. त्याने मुंबई ठाण्यासह भिवंडी, अंबरनाथ आदी परिसरांत अशाच प्रकारे बोलण्यात गुंतवून अनेकांची फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे. हीच टोळी ‘बोलबच्चन गँग’ या नावानेही कुप्रसिद्ध आहे. अनिल याला ठाणे न्यायालयाने १३ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याच्याकडून अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याने आणखी कोणाची, कोणत्या ठिकाणी फसवणूक केली, याचा तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.