लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुख्यात गुंड सिद्धेश बाळा म्हसकर ऊर्फ सिद्धेश ऊर्फ सिद्धू अभंगे (२७) याच्यावर ठाणे पोलिसांनी बुधवारी स्थानबद्धतेची कारवाई करून त्याची नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली. अभंगे हा युटयूबचा भाई म्हणूनही कुख्यात आहे. तर, गुंड सौरभ वर्तक यालाही दोन वर्षांसाठी ठाण्यासह तीन जिल्ह्यांतून तडीपार केल्याची माहिती सूत्रांनी दिली.खंडणी उकळणे, खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीररीत्या हत्यार बाळगणे, सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवणे, हाणामारीचे प्रकार करणे तसेच अमली पदार्थांची तस्करी करणे आदी विविध कलमांखाली दोघांविरुद्ध ठाण्यातील कोपरी, चितळसर आणि वर्तकनगर अशा वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. काही महिन्यांपूर्वी सिद्धूसह त्याच्या आठ ते दहा साथीदारांविरुद्ध चितळसर पोलीस ठाण्यात रिव्हॉल्व्हर आणि लाठ्याकाठ्या घेऊन दहशत पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर, लगेचच त्याच्यावर कोपरी पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली आणखी एक गुन्हा दाखल झाला होता. या सर्वच गुन्ह्यांमध्ये त्याची जामिनावर सुटका झाली होती. दरम्यान, निवडणूक काळात उपद्रवी ठरणाऱ्या अशा गुंडांवर कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी अलीकडेच दिले होते. त्यानुसार, चितळसर पोलिसांनी सिद्धूच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे सादर केला होता. त्यास पोलीस आयुक्तांनी मंजुरी दिली. गृहविभागानेही त्यास अनुमती दिली होती. याच अंतिम आदेशाची बजावणी टाळण्यासाठी तो भूमिगत राहून पोलिसांना हुलकावणी देत होता. तो या काळात अंबरनाथ, बदलापूर, कळवा, कल्याण, पुणे, सोलापूर, हैदराबाद आदी शहरांमध्ये आश्रय घेऊन आपल्या वास्तव्याचे ठिकाण सातत्याने बदलत होता. कोपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगारकर, दत्ता गावडे आदींच्या पथकाने अखेर त्याचे वास्तव्याचे ठिकाण शोधून तो गोवा येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना चिपळूण रेल्वेस्थानकावर स्थानिक पोलिसांच्या मदतीने कोपरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर, त्याला चितळसर पोलिसांनी त्याच्यावर २ आॅक्टोबर २०१९ रोजी नाशिक रोड येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्धतेची कारवाई केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांनी सांगितले.गुंड सौरभ वर्तक दोन वर्षांसाठी तडीपारधर्मवीरनगर येथे राहणारा सराईत गुन्हेगार सौरभ वर्तक (३२) याच्यावरदेखील दोन वर्षांसाठी चितळसर पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली आहे. त्याला ठाणे, मुंबई आणि रायगड या तीन जिल्ह्यांतून हद्दपार केले आहे. वर्तक याच्याविरुद्ध खंडणी, दंगल, मारहाण करणे, शस्त्र बाळगणे आदी गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
ठाण्यातील कुख्यात गुंड सिद्धू अभंगे याच्यावर स्थानबद्धतेची तर सौरभवर तडीपारीची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2019 11:03 PM
युटयूबचा भाई म्हणून कुख्यात असलेला गुंड सिद्धेश बाळा म्हसकर ऊर्फ सिद्धेश ऊर्फ सिद्धू अभंगे (२७) याच्यावर ठाणे पोलिसांनी बुधवारी स्थानबद्धतेची कारवाई करून त्याची नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली. तर सौरभ वर्तक यालाही दोन वर्षांसाठी ठाण्यासह तीन जिल्ह्यांतून तडीपार करण्यात आले आहे.
ठळक मुद्देचितळसर पोलिसांनी केली कार्यवाही अभंगे याच्यावर खंडणीसह अनेक गुन्ह्यांची नोंद