मुरबाड : नैसर्गिक वरदान लाभलेल्या मुरबाड तालुक्यात आता निसर्गशाळा सुरू होणार असून निसर्गप्रेमींना निसर्गाबाबतचे सर्व ज्ञान तसेच मार्गदर्शन तालुक्यातच मोफत उपलब्ध होणार आहे. म्हाडस- शेलारी येथील शांताई निसर्ग पर्यटन केंद्र येथील १५ एकर परिसरात हा उपक्र म राबवण्यात येत आहे. सध्या ही शाळा प्रायोगिक तत्त्वावर सुरू असून १ मार्चला शाळेचे लोकार्पण होणार असल्याचे योगेंद्र बांगर यांनी सांगितले.
कुणबी समाजोन्नती मंडळाचे अध्यक्ष शांताराम बांगर यांनी ४० वर्षे जोपासलेल्या या वृक्षसंपत्तीचे, समृद्ध बागेचे रूपांतर नैसर्गिक शाळेत होत आहे. हा प्रकल्प सत्यात उतरवण्यासाठी प्राथमिक शिक्षक योगेंद्र बांगर यांनी विशेष मेहनत घेऊन या बागेत सुमारे ५०० वनस्पतींची लागवड केली आहे. जंगलातील प्राणी, पक्षी, कीटक, सर्प, झाडे याबाबत मोफत माहिती दिली जाणार आहे.विद्यार्थ्यांना आणि पुस्तकप्रेमींना निसर्गाच्या सान्निध्यात ग्रंथ, पुस्तके वाचता यावी, या हेतूने येथे वनवाचनालयदेखील सुरू करण्यात आले. सुरुवातीला वाचनासाठी हजार पुस्तके ठेवण्यात येणार आहेत. दररविवारी स. १० ते ५ दरम्यान ही शाळा निसर्गप्रेमींसाठी खुली राहणार आहे. कातकरी सेवा संघ यांच्या वतीने या शाळेचे व्यवस्थापन पाहिले जाणार आहे. याबरोबरच ध्यानमंदिर, वृक्षमंदिर, मधुमेह पार्क, वस्तुसंग्रहालय, म. गांधी दालन, श्री रामसीतावन अशा विविध उपक्रमांची उभारणी केली जाणार आहे. यापूर्वी या जागेवर ग्रामीण पक्षिमित्र संमेलनही भरवण्यात आले होते. तेव्हा सुमारे ३५०० पक्षिमित्रांची उपस्थिती होती. त्याच अनुभवावर येथे निसर्गशाळा सुरू होत आहे. यापूर्वी बांगरसर यांनी सुरू केलेल्या ‘आजीबार्इंची शाळा’ या उपक्रमाला देशविदेशांतील पर्यटकांनी भेट देऊन त्याचा गौरव केला. या यशामुळे तिला ‘लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड’मध्ये मानाचे स्थान मिळाले.