मीरारोड - मीरा रोड मध्ये भाजपाने शिवजयंती निमित्त लावलेल्या बॅनर वरून संताप निर्माण झाला असतानाच आता भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमीत्त लावलेल्या बॅनर वरून देखील निषेध होत असल्याने अखेर बॅनर काढण्याची नामुष्की भाजपा वर पुन्हा ओढवली आहे . छत्रपतींचा अवमान केल्या नंतर पुन्हा आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या भाजपाची हि मुजोरी असल्याचा संताप व्यक्त होत आहे .
भाजपाच्या वतीने १४ एप्रिल रोजीच्या भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त शुभेच्छा देणारा लांब आकाराचा बॅनर हा मीरारोडच्या सिल्वर पार्क जंक्शन वर लावण्यात आला . बॅनर वर बाबासाहेबांचे छायाचित्र हे पंतप्रधान पासून भाजपाचे वादग्रस्त व गुन्हे दाखल असलेल्या पदाधिकारी यांच्या सह एकाच रांगेत टाकण्यात आले . या विरोधात एक विचार मंच च्या वतीने मीरारोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक वसंत लब्दे यांना निवेदन देण्यात आले . भाजपाची हि स्थानिक मंडळी बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या वादग्रस्त नेते व पदाधिकारी यांच्या सोबत एकाच रांगेत ठेऊन त्यांना कमी लेखत आहेत .
आंबेडकरांचे अनुयायी व त्यांच्या विचारांवर चालणाऱ्या जनतेत संताप व्यक्त होत आहे . या आधी देखील भाजपाची हि मंडळी असा प्रकार ते करत आले असून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी या वेळी केली . या प्रकरणी पोलिसांनी समज दिल्यावर भाजपा नगरसेवक अरविंद शेट्टी यांनी सदरचा फलक काढून टाकला. अनधिकृत म्हणुन तोडलेल्या इमारती जवळ लोखंडी फ्रेम उभारून त्यावर फलक लावले जातात . या आधी शिवजयंती निमित्त याच ठिकाणी लावलेल्या फलकात छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र देखील असेच एका रांगेत तेही शेट्टी च्या छायाचित्र जवळ लहान आकारात टाकले होते . त्यावेळी फलक च्या ठिकाणी शेट्टी व तक्रारदार यांची वादावादी झाली होती . तक्रारी नंतर फलक काढून टाकण्यात आला होता . इतकंच नव्हे तर अरविंद शेट्टी वर अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला होता .
वेश्या व्यवसाय अर्थात पीटा सह अन्य गुन्हे दाखल असलेल्या भाजपाच्या स्थानिक दाखलेबाज मंडळी वर मीरा रोड पोलिस तसेच पालिका मात्र सत्ताधारी पक्षाचे असल्याने ठोस कारवाई करत नाही म्हणून यांची मुजोरी वाढली असून शिवाजी महाराज यांच्या नंतर आता बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करण्याची यांची मजल गेली असल्याचा संताप तक्रारदारांनी व्यक्त करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे .