ठाणे : ठाणे महापालिकेच्या वर्षभरानंतर होणाऱ्या निवडणुकीत या शहरातील काही प्रख्यात व्यावसायिक बिल्डर आपले उमेदवार उतरवण्याची तयारी करीत असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किटेक्स उद्योगसमूहाने आपले काही उमेदवार उतरवून तेथील राजकीय व्यवस्थेचा ताबा घेतला. बिल्डर सूरज परमार यांना ठाण्यातील काही नगरसेवकांच्या दबावापोटी आत्महत्या करायला लागल्याच्या पार्श्वभूमीवर हा केरळ पॅटर्न ठाण्यात राबवण्याची चाचपणी सुरु झाली आहे.केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत किटेक्स उद्योगाने पुरस्कृत केलेले १९ पैकी १७ उमेदवार विजयी झाले. ठाण्यातील प्रख्यात बिल्डर सूरज परमार यांनी काही नगरसेवकांकडून होणाऱ्या छळवणुकीला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्रकरण गाजत आहे. मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील बिल्डरांनी राजकीय व्यवस्थेकडून होणाऱ्या शोषणाविरोधात अलीकडेच मोर्चा काढून रोष प्रकट केला. त्या पार्श्वभूमीवर केरळमधील हा कॉर्पोरेट पॅटर्न ठाण्यातील बिल्डरांना राबवण्याची प्रेरणाच मिळाल्याचे समजते.एका बिल्डरने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, निवडणुकीत आम्ही राजकीय पक्षांना पैसा व यंत्रणा पुरवतो. निवडून आल्यावर काही नगरसेवक आम्हालाच त्रास देतात. परमार प्रकरण हे त्यातूनच घडले. समाजातील सुशिक्षित व चांगल्या प्रतिमेच्या काही मंडळींना केवळ पैसा नसल्याने राजकीय क्षेत्रात येता येत नाही. त्यांना पैसा व बळ पुरवले तर ते अशा काही मोजक्याच नगरसेवकांना पराभूत करून त्यांना आपली जागा दाखवू शकतात. त्यामुळे केरळ पॅटर्नची चर्चा सुरु आहे. ठाणे महापालिकेची निवडणूक २०१७ मध्ये होणार असल्याने बिल्डरांना काही मोजकेच उमेदवार देऊन महापालिकेत आपला दबावगट निर्माण करण्याकरिता पुरेसा कालावधी असल्याचे मतही व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
आता बिल्डरांच्या पक्षाचे उमेदवार?
By admin | Published: November 11, 2015 12:14 AM