प्रशांत माने
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : पावसाळ्यात दरवर्षी साथींचे आजार डोकेवर काढतात. मात्र, मागील वर्षी कोरोना काळात केडीएमसीसह सर्वच सरकारी यंत्रणांनी नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन केल्याने कोरोना व पावसाळ्यातील साथींचे आजार नियंत्रणात होते. सध्या कोरोनाचे रुग्ण काहीसे कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. परंतु, यामुळे साथींच्या आजारांचे आव्हान मनपासमोर उभे ठाकण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे.
पावसाळ्यात मेलरिया, डेंग्यू, टायफॉइड, कॉलरा आदी साथींचे आजार बळावतात. अशा वेळी शहरांमधील मनपा व खासगी रुग्णालयांमध्ये या आजारांच्या रुग्णांची उपचारांसाठी मोठ्या प्रमाणावर झुंबड उडते. ऊन-पावसाच्या खेळामुळे वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात. २०१९ मधील जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांतील आढावा घेता विविध तापांचे २२ हजार ८१३ रुग्ण आढळले होते. दरम्यान, गेल्या वर्षी कोरोना काळात साथीच्या आजारांचा प्रभाव फारसा जाणवला नाही. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत तेव्हा डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड, गॅस्ट्रो या साथींचे रुग्ण अत्यल्प प्रमाणात आढळले होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी हद्दीत धूर फवारणी मोठ्या प्रमाणावर करण्यात आली होती. कोरोनाच्या रुग्णांचे सर्वेक्षण करताना केडीएमसीकडून अन्य साथरोगांचीही माहिती घेतली जात होती, तसेच खबरदारीचे आवाहन केले जात होते. नागरिकांनी काळजी घेतल्याने गेल्या वर्षी साथीच्या आजारांचे प्रमाण कमी दिसून आले.
दरम्यान, यंदाही पावसाळ्याच्या धर्तीवर खबरदारीचे आवाहन नागरिकांना केले जात आहे. त्यामुळे कोरोनाच्या सावटात यंदाही साथीच्या आजारांना वेसण घालून जाणकारांचा दावा फोल ठरवला जातो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
---------
अशी आहे आकडेवारी
वर्षे-डेंग्यू- मलेरिया- लेप्टोस्पायरोसिस
२०१७-२४-१७९-०
२०१८-२६-१८२-४
२०१९-८८-१३१-०
२०२०-२९-१२६-०
मे २०२१ -६-२३-०
---------------
२८ केंद्रांवर गप्पी माशांची पैदास
गप्पी मासे डेंग्यू आणि मलेरियाच्या डासांच्या अळ्या खातात. त्यामुळे केडीएमसीकडून २८ केंद्रांवर गप्पी माशांची पैदास केली जात आहे. ज्या ठिकाणी डासांच्या अळ्या मोठ्या प्रमाणावर आढळतात, तेथे हे गप्पी मासे सोडले जातात. त्यामुळे डासांची पैदास रोखण्यास मदत होते.
------------------
ही घ्या काळजी
बदलत्या हवामानात तापाचे रुग्ण आढळतात. अस्वच्छता, साचलेल्या पाण्यात डेंग्यूची पैदास वाढते. नागरिकांनी आपल्या परिसरात कुठेही पाणी साचू देऊ नका, परिसरात स्वच्छता राखा. डासांचा प्रादुर्भाव वाढला असेल तर मनपातर्फे धूर फवारणी करून घ्या. ताप आल्यास डॉक्टरांशी संपर्क साधून तातडीने रक्तचाचण्या करून घ्या. पाणी उकळून आणि गाळून प्या.
------------------------------------------------------
साथरोग कृती आराखड्याची अंमलबजावणी
पावसाळ्याच्या धर्तीवर साथरोग कृती आराखडा तयार केला आहे. मनपाच्या दोन्ही रुग्णालयांमध्ये आवश्यक अशा औषधांचा साठा आहे. साथीच्या आजारांसाठी स्वतंत्र कक्षाचीही उभारणी केली जाते. मनपाच्या नागरी आरोग्य केंद्रांतर्फे घरोघरी सर्वेक्षण केले जाते. आजार होऊ नयेत, यासाठी जागृती केली जाते. सर्वेक्षण व खासगी रुग्णालयात आढळणाऱ्या रुग्णांच्या परिसरात तातडीने प्रतिबंधात्मक कार्यवाही करणे, तापाच्या रुग्णांचे रक्ताचे नमुने तपासणे आदी कार्यवाही साथरोग काळात सुरू असते. ज्या बांधकामांच्या ठिकाणी पाणी साचते त्यांनाही नोटिसा दिल्या जातात. तेथील कामगारांची दर १५ दिवसांनी आरोग्य तपासणी केली जाते.
- डॉ. प्रतिभा पानपाटील, साथरोग विभागाच्या अधिकारी, केडीएमसी
------