ठाणे : येत्या काही महिन्यांवर ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका आल्या आहेत; परंतु अद्यापही नगरसेवक निधी, प्रभाग सुधारणा निधी, तसेच यंदाच्या अर्थसंकल्पातील निधीदेखील मिळालेला नाही. महासभेने अर्थसंकल्प मंजूर केला असतानाही आयुक्तांनी मंजूर केलेल्या अर्थसंकल्पानुसारच कामकाज का केले जात आहे. असा सवाल करून सर्वपक्षीय सदस्यांनी शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत गदारोळ केला. या निधीवरून शिवसेनेच्या सदस्यांनी पांघरून टाकण्याचा प्रयत्न केला असता, ही भूमिका अयोग्य असून, राष्ट्रवादीने शिवसेनेच्या त्या भूमिकेचा निषेध केला, तसेच हणमंत जगदाळे यांनी सभात्याग केला.
निधी नसल्याने प्रभागातील कामे ठेकेदारांनी अर्धवट सोडलेली आहेत. त्यामुळे निवडणुकीत नागरिकांना आम्ही कशी तोंडे दाखवायची असा सवाल भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी केला, तसेच यंदाचा अर्थसंकल्पातील निधी केव्हा मिळणार असा सवालही त्यांनी विचारला. यावर सोमवारपासून प्रभाग सुधारणा आणि नगरसेवक निधीच्या फाईल घेतल्या जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली; परंतु ही कामे महासभेने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पानुसार दिली जाणार आहेत की, आयुक्तांनी मंजूर केलेल्या अर्थसंकल्पानुसार, असा सवाल राष्ट्रवादीचे नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी केला. त्यावर सध्या कामांची निकड लक्षात घेऊन आयुक्तांच्या बजेटनुसारच ती केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. त्यामुळे सदस्य आणखीनच आक्रमक झाले. तुम्हाला जर महासभेने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पानुसार निधी द्यायचा नसेल तर स्थायी समितीनेदेखील अर्थसंकल्प मंजूर केलेला आहे. त्यानुसार तरी कामे करण्यासाठी निधी देण्यात यावा अशी मागणी जगदाळे यांनी लावून धरली.
यावर प्रशासनाऐवजी शिवसेनेचे नगरसेवक राम रेपाळे यांनी उत्तर दिले. महासभेतदेखील महापौरांनी कोरोनामुळे पालिकेच्या तिजोरीवर कसा परिणाम झालेला आहे याची माहिती दिलेली आहे. त्यामुळे कामांची निकड लक्षात घेऊनच त्यानुसार प्राधान्यक्रम देऊन सोमवारपासून फाईल घेण्यास सुरुवात केली असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या या उत्तरावरून जगदाळे संतप्त झाले आणि प्रशासनाच्या कारभारावर पांघरुण घालणे अयोग्य असल्याची टीका करून त्यांनी सभात्याग केला.
मुंब्रा आणि वागळे प्रभाग समितीत निधीचे वाटप
एकीकडे नगरसेवकांना प्रभाग सुधारणा आणि नगरसेवक निधी मिळत नसताना दुसरीकडे मात्र मुंब्रा आणि वागळे प्रभाग समितीत निधीचे वाटप झाल्याचा आरोप कृष्णा पाटील यांनी केला. त्यावरून शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक झाले, तर स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी याबाबतचे पुरावे असतील तर सादर करा, असे सांगितले. त्यानुसार वेळ आल्यावर पुरावे सादर केले जातील असे पाटील यांनी स्पष्ट केले.